Urea Fertilizer Shortage Pudhari
पुणे

Urea Fertilizer Shortage: आंबेगाव तालुक्यातून युरिया 'गायब'!

लिंकिंगच्या नावाखाली लूट सुरू; शेतकरी संतप्त

पुढारी वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ: खरीप हंगामाच्या तोंडावरच आंबेगाव तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेला युरिया वेळेवर न मिळाल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्यातील अनेक कृषिसेवा केंद्रामध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असले, तरी काही ठिकाणी साठा लपवून ठेवला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, उपलब्ध असलेला युरियाही 'लिंकिंग पद्धती'च्या नावाखाली इतर खते खरेदी करण्याची सक्ती करूनच दिला जात असल्याने शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप होत आहे.

  1. Urea Supply

याहून गंभीर बाब म्हणजे अनेक विक्रेते खरेदीची बिले देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तक्रार करण्याचा मार्गच बंद झाला असून, ते दुहेरी कचाट्यात सापडले आहेत. कृषी विभागाकडून बिले सादर करण्याची अट घातली असली, तरी प्रत्यक्षात बिलेच न मिळाल्याने ही अट शेतकऱ्यांसाठी निष्प्रभ ठरत आहे.

मका, आले, टोमॅटो, ऊस व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेल्या या तालुक्यात युरियाची मागणी वाढलेली असताना पुरवठा कोलमडल्याचे चित्र आहे. कांदा पिकातील मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी नव्या पिकांवर उभारी घेण्याचा प्रयत्न करत असतानाच खतटंचाईने त्यांच्यासमोर नवे संकट उभे केले आहे.

दरम्यान, काही व्यापाऱ्यांकडून युरियाचा साठा करून कृत्रिमटंचाई निर्माण केल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकरी संघटना व राजकीय नेतेही निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत असून, संतप्त शेतकरी प्रशासनाकडेच आशेने पाहत आहेत. युरियापुरवठा तत्काळ सुरळीत करावा, साठेबाजांवर कारवाई करावी आणि लिंकिंग पद्धतीला आळा घालावा, असा इशारा शेतकरी देत आहेत.

याबाबत आंबेगाव तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता 'बफर स्टॉक लवकरच खुला करण्यात येईल' असे सांगण्यात आले; मात्र ठोस कालमर्यादा देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT