पुणे

जागतिक वन दिन विशेष : शहरी वनीकरण कासवगतीने !

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाढलेल्या प्रदूषणाशी लढा देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी वन विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अर्बन नागरी वनीकरण उपक्रम विकसित केला जात आहे. मात्र, या उपक्रमाचा वेग हा संथ गतीने सुरू आहे.
नागरी वनीकरणाचाच एक भाग म्हणून वारजे येथे 2015 मध्ये वारजे अर्बन वनीकरण हा महाराष्ट्रातील पहिला नागरी वनीकरण प्रकल्प सुरू केला. त्याचबरोबर मांजरी खुर्द, धानोरी, वडगाव बु. आदी परिसरात असाच उपक्रम राबविला असला, तरी धानोरीचे उद्यान वगळता इतर ठिकाणी मात्र या उपक्रमाला घरघर लागली आहे. वारजे येथील 16 हेक्टर ओसाड जमीन डोंगराळ क्षेत्रावर स्वच्छ हवेसह प्रदूषणाची बरोबरी करण्यासाठी अर्बन फॉरेस्ट्री या नावाने उपक्रम आणला.

या अर्बन वनीकरण उद्यानात वड, पिंपळ, सोनचाफा, आपटा, कडुनिंब, कांचन, गोल्डन बनबूज, बदाम, कात, आवळा, उंबर इत्यादी सुमारे 23 देशी वनस्पतींच्या प्रजातींचा समावेश आहे. मात्र, त्याठिकाणी काही प्रमाणात वृक्ष पाण्याविना गायब झाले आहेत. त्याचबरोबर पूर्वजांच्या आठवणी म्हणूनही वृक्षलागवड केली जात आहे. दरम्यान, मांजरी खुर्द येथील वन विभागाच्या जागेवर वनीकरण मोहीम राबविण्यात आली होती. पंरतु, तेथे तब्बल 1 एकरामध्ये अतिक्रमण झाले आहे.

वन विभागाची मांजरी खुर्द येथे जमीन असून, तेथे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले होते. अर्बन वनीकरण मोहिमेंतर्गतही अनेक वृक्षांची लागवड केली होती. परंतु, काही सोसायट्यांनी अतिक्रमण करून त्या जागी रस्ता तयार केला आहे. रस्ता बनविण्यासाठी जी झाडे तोडली होती, ती पुन्हा लावण्यात आलेली नाहीत. वारंवार तक्रार करूनही त्याकडे वन विभाग दुर्लक्ष करीत आहे.

                                                             प्रसाद जठार (वृक्षप्रेमी)

वन विभाग आणि पुणे मनपाच्या वतीने ही मोहीम सुरू आहे. त्यामध्ये नागरिकांचेही मोठे सहकार्य मिळत आहे. ही अर्बन वनीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी काळात या मोहिमेची व्याप्ती वाढविणार आहे.

                                   राहुल पाटील (उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग)

SCROLL FOR NEXT