किशोर बरकाले
पुणे : राष्ट्रीय स्तरावर शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड तथा नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनयूसीएफडीसी) मुंबई कार्यालयाचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (दि. 24) संध्याकाळी मुंबईत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यातील सर्व सहकारी बँकांनी या अम्ब्रेला संघटनेचे सदस्य व्हावे, असा आग्रह केंद्र सरकार धरेल आणि अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असेल आणि एक प्रकारे त्यांना बूस्टर मिळेल. हा कार्यक्रम गोरेगाव पूर्व, मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता आयोजित केला आहे.
‘सहकारातून समृद्धी’ या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार देशात सहकारात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात ‘एनयूसीएफडीसी’ कार्यालय सुरू होत असल्याने येथील बँकिंग क्षेत्रासाठी ते महत्त्वपूर्ण राहणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भुटानी, राज्याचे सहकारचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा व अन्य अधिकारीवर्गासह राज्यातील 465 नागरी सहकारी व मल्टिस्टेट सहकारी बँकांचे प्रतिनिधी, गुजरातमधील बँकांसह राज्यातील मोठ्या पतसंस्थांचे मिळून सुमारे 2 हजार 500 पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती सहकार आयुक्तालयातून देण्यात आली.
देशात कार्यरत असलेल्या 1472 बँकांपैकी 428 नागरी सहकारी आणि 35 मल्टिस्टेट मिळून 463 बँकांचे जाळे एकट्या महाराष्ट्रात आहेत. शिवाय या बँकांची उलाढाल मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राने सभासदत्व घेतल्यास हे महामंडळ पूर्ण क्षमतेने लवकर कार्यान्वित होईल, असा केंद्राचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.
देशातील नागरी सहकारी बँकांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेले ‘एनयूसीएफडीसी’ महामंडळाची संकल्पना स्वागतार्ह असून, बँकांनीही त्यांचे सभासदत्व घ्यायला हवे. मात्र, ‘एनयूसीएफडीसी’ मध्ये बँकांनी गुंतवणूक केल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेले वैधानिक तरलता प्रमाणामध्ये (एसएलआर) ती धरण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य झाल्यास बँका या महामंडळात जास्तीत जास्त गुंतवणूक करतील, असे वाटते.विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई