पुणे; पुढारी वृत्तसेवा : भरत नाट्यमंदिरच्या व्यवस्थापनाने स्पॉट लाईटच्या वीजबिलासह इतरही शुल्क वाढविल्याचा फटका नाट्यस्पर्धांना बसू लागल्यामुळे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आगामी काळातील स्पर्धांसाठी स्थळ बदलण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये होणार्या राज्य बालनाट्य अन् संस्कृत नाट्य स्पर्धांसाठी महापालिकेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह मिळावे, यासाठी शासनाकडून पालिका व्यवस्थापकांना पत्र देण्यात येणार आहे.
भरत नाट्यमंदिर नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने स्पॉट लाईटच्या वीजबिलात दुप्पट दरवाढी केली. त्यामुळे राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सहभागी संस्था आणि कलाकारांमध्ये नाराजीचा सूर आहे. या शुल्कवाढीत सवलत देण्याची विनंती करणारे पत्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नियुक्त केलेल्या समन्वयकाच्या स्वाक्षरीने देऊनही त्याची दखलही भरत नाट्य मंदिराच्या व्यवस्थापनाने घेतली नाही.
ही दरवाढ बघता भरत नाट्यमंदिरामध्ये स्पर्धा आयोजित करणे अवघड झाल्यामुळे पुढील स्पर्धांसाठी शासनाने महापालिकेची नाट्यगृहे घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, केवळ राज्य नाट्य स्पर्धांनाच नव्हे तर 'पुरुषोत्तम करंडक'सारख्या स्पर्धेलाही या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे 'महाराष्ट्रीय कलोपासक'च्या पदाधिका-यांनीही व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक यांचे पत्रही आज भरत नाट्यमंदिर व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. राज्य नाट्य स्पर्धांच्या तारखा उशिरा जाहीर होतात. त्यामुळे महापालिका नाट्यगृह स्पर्धेसाठी उपलब्ध होत नाही. भरत नाट्य मंदिरच्या व्यवस्थापनाने वीजबिलात जी वाढ केली आहे, ती संघांना परवडणारी नाही. त्यामुळे आता पुढील नाट्य स्पर्धा महापालिकेच्या नाट्यगृहात भरविण्याचा निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह उपलब्ध व्हावे, असे पत्र आम्ही पालिकेच्या व्यवस्थापकांना देणार आहोत.
– राहुल लामखेडे, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला देखील दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरुषोत्तम स्पर्धेवेळी आम्हाला ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे ाम्हालाही महाअंतिम फेरीपूर्वी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.
– राजेंद्र ठाकूर देसाई,
चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक