पुणे

अवकाळी पावसाचा तडाखा ; आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा :  सर्वसाधारणपणे होळी उत्सवापासून कडक उन अपेक्षित असते. परंतु निसर्गात वेळोवेळी बदल होत असल्यामुळे सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे, छोट्या,मोठ्या व्यावसायिकांचे, बांधकाम व्यावसायिकांचे फारच नुकसान होत आहे. या मोसमात आंबाफळ ऐन भरात असते. परंतु अशा अवकाळी पावसामुळे मोहर गळतो,आंब्याच्या कै-या झाडावरुन पडतात, पाड लागलेले, झाडावर पिकलेले आंबे काळे पडतात अनेक ठिकाणी आंब्यात किडे होतात यामुळे आंबा उत्पादनात घट होवून नुकसान होते परिणामी आंब्याचे भाव वाढतात.

याचा फटका आंबा खाणा-यांना बसतो. अशा अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा आदी काढणीस आलेल्या पिकांनाही बसतो. पिके जमिनीवर पडतात आणि काढलेल्या पिकांचे अचानक पाऊस आल्यामुळे भिजून नुकसान होते. हवामान बदलामुळे द्राक्ष बागांवरही परिणाम होतो. नुकतेच वेलीस लागलेली टोमॕटो, काकडी, अवकाळी पावसामुळे गळतात. पावसाळा जवळ आल्यावर जनावरांचा चारा भिजू नये यासाठी आवरण टाकून झाकून सुरक्षित ठेलला जातो परंतु अवकाळी अचानक पाऊस आल्यामुळे चारा भिजतो यामुळे जनावरांची खाण्याची आबाळ होते.

तसेच उन्हाळ्यात ऊसाचा रस, सरबत, आईसक्रिम आदी थंडपेय विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात असतो. अचानक आलेल्या पावसामुळे या धंद्यावर परिणाम होतो. तसेच वातावरणात बदल झाल्यामुळे आणि कचरा भिजल्यामुळे दुर्गंधी पसरते. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो तसेच ऐन परीक्षेच्या दिवसात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची धांदल उडत आहे. पावसाळा जवळ आल्यानंतर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी साधारण मे महिन्यात वीज महापारेषण,महावितरण कडून झाडाच्या फांद्या छाटणे, आदी प्री मान्सून मेंटेनन्स केले जाते. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे अशी कामे अपुरी राहील्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत होवून छोट्या, मोठ्या व्यवसायावर परिणाम होतो. नागरिकांचीही तारांबळ उडते उकाड्यास तोंड द्यावे लागते. हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज बरोबर होईलच याची खात्री देता येत नाही. अशा अवकाळी पावसाचे नैसर्गिक आव्हान असून शेतकरी, व्यावसायिक आणि नागरिक हवालदिल होत आहेत.

SCROLL FOR NEXT