पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने एक सुरक्षा हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे.
विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अश्लील कृत्य करणार्या अनिश वसंत गायकवाड या तरुणाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयाने पोलिस कोठडीदेखील सुनावली आहे. त्याच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःशृंगी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपासून घडलेल्या घटनांची दखल घेत अखेर विद्यापीठाने विद्यार्थी प्राध्यापक, कर्मचारी आणि अभ्यागत यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधितांना आता या हेल्पलाइनद्वारे तक्रारी नोंदवता येणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सुरू केलेल्या 020-48553383 या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येणार आहे.