पिंपरी : महाराष्ट्राचे राजकारण, साहित्य, संस्कृती आणि वाड.मय यांच्यावर संत वाड.मयाचा प्रभाव आहे. भगवद्गगीता, हनुमान चालिसा डिजिटल स्वरुपात आली. गजानन महाराजांची पोथी डिजिटल बनून तयार झाली आहे. बदलत्या काळानुसार संत वाड.मयात देखील डिजिटल तंत्रज्ञान आले पाहिजे. संतसाहित्य डिजिटल स्वरुपात आल्यास नवीन पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 29) केले.
रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठान व अंशुल प्रकाशन यांच्या वतीने आकुर्डी येथील पीसीसीओई कॉलेजच्या सभागृहात दिवंगत माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जीवन कार्यावरील 'परामर्श एका शिल्पकाराचा' या ग्रंथाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. पत्रकार, लेखक विजय जगताप यांनी या ग्रंथाचे लेखन, संपादन केले आहे.
संतसाहित्याचे अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे अध्यक्षस्थानी होते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. गजानन एकबोटे, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की,' प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासोबत माझी चांगली मित्रता होती. त्यांना साहित्य, संस्कृती, कला, सामाजिक, राजकीय अशा विविध पातळ्यांवर चांगली जाण होती. संत वाड.मय आणि साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्यावरील ग्रंथ निर्मिती ही प्रेरणादायी आहे.' दिग्विजय सिंग म्हणाले की, 'प्रा. प्रा. मोरे यांच्यावर लिहिलेला ग्रंथ हा मूलभूत संशोधनाचा भाग आहे. निरपेक्ष भावनेतून हा ग्रंथ तयार झाला असल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले.' प्रा. मोरे हे उत्तम वक्ते, मिश्किल स्वभावाचे नेते होते, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्राच्या विधिमंडळात असतानाच्या आठवणी सांगताना गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राची ही विशेषत: राहिली आहे की, येथे विविध राजकीय पक्ष आणि विचारधारा असल्या तरी राजकीय नेत्यांमध्ये चांगले संबंध होते. आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता होती. मात्र, मनभेद नव्हते.
दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कन्या डॉ. स्नेहल मोरे-जाधव यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. त्या म्हणाल्या की, माझ्या बाबांवरील हा ग्रंथ युवा नेत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.