यवत/खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीत भुलेश्वर घाटाच्या पायथ्याला एका अनोळखी तरुणाचा धारदार हत्याराने वार करीत त्यानंतर ज्वालाग्रही पदार्थ टाकून खून करून टाकून दिलेला मृतदेह दि. 27 जून रोजी सकाळी आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला असून, मृत तरुणाची ओळख पटवत 5 आरोपींना जेरबंद केल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी शनिवारी दिली.
योगेश पडळकर (वय 25), राजश्री पडळकर (वय 23, रा. माळशिरस ता. पुरंदर), विकास कोरडे (वय 21, रा. आनंदवाडी, टाकळी ढोकी, ता. जि. धाराशिव), शुभम वाघमोडे (वय 22, रा. मुरुड, ता. जि. लातूर) आणि काकासाहेब मोटे (वय 42, रा. येवती, ता. जि. धाराशिव) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर लखन सलगर (वय 24 वर्षे, रा. टाकळी ढोकी, ता. जि. धाराशिव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest Pune News)
घटनेप्रकरणी बापूराव दडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लखन सलगर यांच्या खुनाबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि यवत पोलिस तपास करीत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यांतील दाखल हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदीची तपासणी सुरू असताना धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलिस स्टेशन येथील हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदीच्या रजिस्टरमध्ये लखन सलगर (वय 24 वर्षे, रा. टाकळी ढोकी, ता. जि. धाराशिव) हा या गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता योगेश पडळकर, राजश्री पडळकर, विकास कोरडे, शुभम वाघमोडे, काकासाहेब मोटे या आरोपींनी अनैतिक संबंधांच्या कारणावरून संगनमत करून कट रचून लखन सलगर यास भुलेश्वर घाटाच्या पायथ्याला तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावर, उजव्या छातीवर, पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकून त्यास पेटवून देत जिवे ठार मारल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. पाचही आरोपींना दि. 11 रोजी अटक केली असून, दौंड न्यायालयाने सर्व आरोपींना दि. 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.