पुणे : पुढारी वृत्तसेवा : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विषयांसाठी 'एकच पुस्तक' या उपक्रमाअंतर्गत पुस्तके शहरातील शाळांकडे दाखल झाली आहेत. येत्या सोमवारपर्यंत (दि. 19) पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील, अशी माहिती शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली. दरम्यान, शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शहरातील बहुतांश शाळांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या पाठीवर वाढत चाललेल्या ओझ्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणक्षेत्रापासून ते सामाजिक क्षेत्रापर्यंत सर्वांनी चिंता व्यक्त केली होती.
त्यावर सामाजिक संस्थांपासून ते राज्य सरकारपर्यंत विचारमंथन करण्यात आले. अखेर, पुणे जिल्हा परिषदेने 2017 ते 18 या वर्षात 'एक वही, एक पुस्तक' असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला. पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि शिक्षणाधिकारी सुनील कुर्हाडे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील काही शाळांमधून प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प राज्यस्तरावर राबविण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याअंतर्गत शहरातील शाळांमध्ये ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
'एक पुस्तक, एक वही' या उपक्रमांतर्गत दाखल झालेली पुस्तके चार भागांमध्ये विभागण्यात आली आहे. चाचणीपर्यंत भाग एक, सहामाईपर्यंत भाग दोन, चाचणी तीनचा भाग व वार्षिकचा भाग चार, अशा प्रकारे ही विभागणी आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना वेळेनुसार संबंधित पुस्तके वापरता येणार असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. या पुस्तकांमध्ये दोन कोरी पाने देण्यात आली आहेत. शासनाकडून ऐंशी टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. अद्याप काहींची प्रतीक्षा आहे. सोमवारपासून शाळा सुरळीत सुरू होईल, त्यानंतर सर्व पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मॉडर्न माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी दिली. \
हे ही वाचा :