पुणे

पुणे : नदी सुधार प्रकल्पाच्या आडून पात्रात राडारोडा

अमृता चौगुले

हिरा सरवदे

पुणे : बहुचर्चित नदी सुधार प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे बेकायदेशीररीत्या राडारोडा टाकणार्‍या मंडळींचे चांगलेच फावले आहे. हे काम सुरू असलेल्या ठिकाणाजवळच काम करणार्‍या कंपनीचे नाव सांगून इतरांकडून बिनदिक्कतपणे राडारोडा टाकला जात आहे. परिणामी नदीपात्राची वाट लागत असल्याचे दै 'पुढारी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. हा नदी सुधार प्रकल्प पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे चर्चेत आला आहे.

नदीच्या सुशोभीकरणाने पाण्याच्या वहन क्षमतेवर गंभीर परिणाम होईल, असा आक्षेप घेऊन त्यांनी हरित न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निकालाच्या अर्थाबाबतही महापालिका आणि पर्यावरणवाद्यांनी परस्परविरोधी दावे केले आहेत. या पार्श्वभूमीवर नदी सुधार योजनेच्या सध्या बंडगार्डन परिसरात सुरू असलेल्या कामाची दै. 'पुढारी'ने पाहणी केली, त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुळा-मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या आडून काम करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या नावाखाली इतरांकडून नदी पात्रात राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून आले. हा मोठ्या प्रमाणात टाकल्या जाणारा राडारोडा तुमच्या कामातील आहे का, असा प्रश्न या प्रतिनिधीने कंपनीच्या अधिकार्‍यांना विचारला असता त्यांनी कानावर हात ठेवले. हा राडारोडा आमच्या कामातील नाही, पण तो नेमका कोण टाकत आहे, याची आपल्याला कल्पना नाही, असे उत्तर त्यांनी दिले. महापालिकेच्या प्रशासनाला याची गंधवार्ताही नसल्याचे तपासणीत लक्षात आले आहे.

गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणार्‍या मुळा-मुठा नदीकाठावरील 44 किलोमीटर भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पास 2018 ला मान्यता देण्यात आली असून यासाठी 4 हजार 727 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम 11 टप्प्यांत करण्यात येणार असून 11 पैकी 3 टप्पे प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आत्त. एका टप्प्यासाठी येणारा 700 कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याचा व उर्वरित खर्च पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे.

प्रकल्पातील टप्पा क्र. 9 मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या कामाची निविदा काढण्यात आली असून हे काम बी. जे. शिर्के कंपनीकडून केले जात आहे. सध्या प्रकल्पाचे काम बंडगार्डन येथील गणेश घाट आणि बोट क्लब असे नदीच्या दोन्ही बाजूंनी सुरू आहे. यामध्ये टो वॉलसाठी मुरूम भरावा टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे.

तसेच संगमवाडीजवळ वाहने नदीपात्रात उतरण्यासाठी भराव टाकून रस्ता केला जात आहे, मात्र प्रकल्पाचे काम सुरूअसलेली ठिकाणे सोडून इतरांकडून दुसरीकडेच नदीपात्रात राडारोडा टाकला जात आहे. राडारोडा टाकणार्‍यांना कोणत्या कामासाठी नदीपात्रात भराव टाकला जात आहे, अशी विचारणा केल्यानंतर प्रकल्पाचे काम करणार्‍या कंपनीचे नाव सांगितले जाते.

या संदर्भात कंपनीच्या अधिकार्‍याकडे सदर ठिकाणी कंपनीकडून कोणते काम सुरू आहे का अशी विचारणा केली का? त्यानंतर अधिकार्‍याने एका कर्मचार्‍याला पाठवून शहानिशा केल्यानंतर राडारोडा टाकणारा ट्रक कंपनीचा नसून तो खासगी असल्याचे समोर आले. सदर ट्रक आणि राडारोडा नेमका कोणाचा आहे. ही आपणास कल्पना नाही मात्र प्रकल्पाचे काम करताना या राडारोड्याची आम्हाला अडचणच होणार असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले.

'त्या' कंपनीलाही येत आहेत अडचणी
नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे,
तेथे वारंवार चोर्‍या होत आहेत. तसेच बंडगार्डन ते संगमवाडी या दरम्यान साडेचार एकर भूसंपादन होणे बाकी आहे. भूसंपादन लवकर झाले तर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेचे भूसंपादन झालेले नाही, त्यामुळे संरक्षण विभागाने काम बंद ठेवण्यास भाग पाडले आहे.

प्रकल्पांतर्गत काय केले जाणार
नदीत येणारे सांडपाणी अडविणे
कचरा व अतिक्रमण रोखणे
पुराचे पाणी नागरी भागात जाणार नाही यासाठी नदीतील अडथळे कमी करणे
नदीची वहन क्षमता वाढविणे
पर्यावरणीयदृष्ट्या नदी पुनर्स्थापित करणे
नागरिकांनी नदीकडे यावे यासाठी मनोरंजनासाठी ठिकाणे,
जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, वनीकरण व सुशोभीकरण करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT