पुणे

चिखली : …अनधिकृत बांधकामे पुन्हा जोरात !

अमृता चौगुले

चिखली; पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय खातेपालट झाल्याने अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करण्याचे सुरू झाल्याने शहरात अनधिकृत बांधकामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत. मध्यंतरी अशा बांधकामांवर मोठ्या कारवाया झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. परंतु पुन्हा त्याच ठिकाणी बांधकामांचा सपाटा सुरू झाल्याची परिस्थिती दिसून येऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याला अडथळा ठरणारी बांधकामे असोत अथवा बेकायदा अनधिकृत, अशी सर्व बांधकामे पाडण्याची धडक कारवाई शहरात झाली होती.

यादरम्यान अनेकांना नोटीस देऊन अशी बांधकामे काढा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे फर्मान काढले गेले होते आणि त्याचा धसका घेत काहींनी बांधकामे जमीनदोस्त केली. तर, अनेक बांधकामांवर पालिकेने बुलडोझर चालविले होते.गेल्या दोन महिन्यांपासून कारवाई पुन्हा थंड पडल्याने अनधिकृत बांधकामे पुन्हा मोठ्या जोमाने उभी राहू लागल्याचे दिसून येत आहे.

चिखली भागात अर्धा गुंठा जागेवर पंचवीस पंचवीस रूम बांधून त्यांना भाडेतत्वाने देणे असेल अथवा जागेला शेड मारून औद्योगिक तत्वाने भाडे घेत लाखो रुपये कमविण्याची शक्कल लढविली जाते. पालिकेच्या अधिकार्‍यांचे या कामांना अभय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक भागात सिलेक्टिव कारवाई होत असल्याचे आरोपही अनेक वेळा करण्यात आले आहेत. प्रशासनाने शहरवासीयांना अनधिकृत,बेकायदा बांधकामे,रस्त्याला अडथळा ठरणारे शेड,टपर्‍या,हातगाड्या या सगळ्यांवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.

ज्या भागात अनधिकृत बांधकामे होण्याची सूचना मिळते,त्या भागात कारवाई चालू आहे. याशिवाय कुणा भागात अशा काही तक्रारी असतील आणि त्या प्राप्त झाल्यास तपासणी करून तातडीने कारवाई केली जाईल,त्यामुळे कुणालाही अभय देण्याचा प्रश्न नाही.

                                                -अण्णा बोदाडे, प्रभागाधिकारी, क प्रभाग

SCROLL FOR NEXT