पुणे: कृषी विभागातील योजनेतील गैरव्यहवार तसेच शासकीय अधिकारी- कर्मचार्यांनी बेकायदेशिरपणे सुरू केलेल्या कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या, विक्री केंद्राची चौकशी करण्यासाठी शासनाने विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि राज्याचे माजी कृषी आयुक्त म्हणून काम पाहिलेले डॉ. उमाकांत दांगट यांची नियुक्ती केली आहे. आमदार सुरेश धस यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांसंबंधी प्राप्त गंभीर स्वरुपाच्या इतर तक्रारींच्या अनुषंगाने ही प्राथमिक चौकशी असल्याचे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. (Latest Pune News)
दांगट यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून चौकशी अहवाल एक महिन्यात कृषी आयुक्तांकडे सादर करावा आणि कृषी आयुक्तांनी दाखल होणारा अहवाल तपासून आपल्या वस्तुस्थितीदर्शक अभिप्रायासह शासनास तात्काळ सादर करावा, असे शासनाचे अवर सचिव अ. न. कुलकर्णी यांनी काढलेल्या आदेशात पुढे म्हटले आहे.
आरोपातील तत्कालीन अधिकार्यांचे धाबे दणााले
आमदार धस यांनी केलेल्या पत्रांमधील आरोपात तत्कालीन कंपन्यांबाबतची माहिती आणि कृषी आयुक्तालय व अन्य तत्कालीन अधिकार्यांची नावेच असल्याचे समजते. त्यामुळे केसनिहाय होणारी चौकशीच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा मंगळवारी (दि.24) कृषी आयुक्तालयात होती. त्यामुळे तत्कालीन अधिकार्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.