इंदापूर : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण (यशवंत सागर) सध्या 91.72 टक्के भरले असून धरणाच्या 16 मोर्यांतून 10 हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणातील पाण्याची पातळी समाधानकारक असल्यामुळे शेतकरी आणि औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दौंड येथून 18 हजार 997 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, यामध्ये उजनीतून वीज निर्मितीसाठी 1 हजार 600 क्युसेक, तर सीना-माढा बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजना, मोठा बोगदा आणि मुख्य कालवा यांद्वारे विविध दराने पाण्याचा बहिर्वाह सुरू आहे. मागील 45 वर्षांत प्रथमच यावर्षी मे महिन्यात उजनी धरणाची पातळी ’वजा (उणे) स्थितीमधून ’प्लस’मध्ये आली होती. सध्या पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत धरण 100 टक्के भरून वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
धरणाची पाणीपातळी व विसर्ग स्थिती (दि. 9 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत) : एकूण पाणीपातळी - 3194.34 मीटर (122.79 टीएमसी), उपयुक्त साठा - 1391.53 दलघमी (49.14 टीएमसी), पाण्याचा प्रसार क्षेत्र - 325.17 चौरस किमी, साठा टक्केवारी - 91.72 टक्के.
भीमा नदीत विसर्ग : 10 हजार क्युसेक, दौंड येथून आवक : 18 हजार 997 क्युसेक, वीजनिर्मितीसाठी विसर्ग : 1 हजार 600 क्युसेक, सीना-माढा बोगदा : 180 क्युसेक, दहिगाव उपसा योजना : 80 क्युसेक, मोठा बोगदा : 900 क्युसेक, मुख्य कालवा : 1 हजार 900 क्युसेक.