जेएनयूमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार; उदय सामंत यांची माहिती pudhari photo
पुणे

जेएनयूमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार; उदय सामंत यांची माहिती

'छत्रपतींच्या विरोधात बोलणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करा'

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ कवी - साहित्यिक कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र सुरू करत आहोत. तसेच, जेएनयूमध्ये छत्रपती श्रीशिवाजी महाराज अध्यासन आणि मराठीतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कोर्स (एमए मराठी) सुरू करणार आहोत.

याशिवाय जेएनयूमध्ये छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचे काम राज्य सरकार भविष्य काळात करणार आहे. त्यासाठी जागादेखील जेएनयूने देण्यासाठी मान्य केलेले आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली ही विशेष रेल्वे पुण्यातून दिल्लीकडे रवाना झाली. या संमेलनात मराठी साहित्ययात्री संमेलनही रंगणार आहे. यानिमित्ताने पुणे रेल्वे स्थानक येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात रेल्वेतील साहित्ययात्री संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत बोलत होते.

त्यांनी साहित्य संमेलनासह विविध विषयांवर विचार मांडले. मी नक्की विशेष रेल्वेतून प्रवास करणार आहे. प्रत्येकाला भेटणार, प्रत्येकाला भेटून माझे समाधान झाले की, मग मी रेल्वेतून उतरणार आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असा टोमणाही सामंत यांनी टीका करणार्‍यांना लगावला.

'छत्रपतींच्या विरोधात बोलणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करा'

छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्याबाबत कोणीही काहीही बोलत आहे. छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्यावर तर काही लोकांनी फेसबुकवर चुकीचा मजकूर टाकण्याचा प्रयत्न केला. अशामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज हे आपले आराध्यदैवत आहेत.

आपल्या दैवतांबद्दल समाजकंटक काहीही बोलत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहेत. जे कोणी हे कृत्य करत आहेत, त्यांना मला सांगायचे आहे की, छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि श्रीसंभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही काहीही चुकीचे लिहिता त्याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रविरोधी आणि देशविरोधी आहात, अशा लोकांवर गुन्हे पोलिसांनी दाखल करावेत.

साहित्यिकांवर टीका करणार्‍यांचा निषेध

साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. साहित्यिक मराठीपण आहे. मी जाहीरपणे निषेध करतो. आमच्यावर टीका करायची असेल आमची नावे घेऊन आमच्यावर टीका करा. एखाद्या राजकीय व्यक्तीवर टीका करायची असेल नावे घेऊन टीका करा. पण, ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली, ज्यांनी महाराष्ट्राचे मराठीपण जपले अशा साहित्यिकांवर टीका करू नका, असे उदय सामंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT