Uber Pudhari
पुणे

Pune Ola Uber Fare: उबेर ॲपकडून कमिशनमध्ये कपात; रिक्षा, टॅक्सीचालकांसह प्रवाशांनाही दिलासा

प्रवाशांच्याही भाडेदरातही वाढ नाही महाराष्ट्र कामगार सभेचे; डॉ. केशव क्षीरसागर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: उबेर कंपनीने गुरुवारी (दि. 2) सकाळपासूनच रिक्षा, टॅक्सीचालकांकडून प्रत्येक राईडवरील प्रत्येक कि.मी.दरम्यान आकारल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये कपात लागू केली आहे. हा सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने टॅक्सी आणि रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.

या निर्णयाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, कंपनीने स्वतःचे कमिशन कमी केले असले तरी त्याचा नागरिकांच्या भाडेदरांवर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रवाशांना पूर्वीच्याच दरात प्रवास करता येणार आहे, तर दुसरीकडे कमिशन कपात केल्यामुळे चालकांच्या प्रत्यक्ष हातात पडणाऱ्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे हा निर्णय चालक आणि प्रवासी अशा दोघांसाठीही फायद्याचा ठरला आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

ते म्हणाले, हा विजय महाराष्ट्र कामगार सभेच्या एकजुटीचा आणि प्रभावी प्रयत्नांचा परिणाम आहे. मात्र, ओला आणि रॅपिडो कंपन्या अजूनही चालकांची पिळवणूक करत आहेत. परिवहन विभाग (आरटीओ) आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी. अन्यथा, हा प्रश्न पुन्हा चिघळू शकतो.

ओला आणि रॅपिडो अद्यापही सुस्त; आंदोलनाचा इशारा

एकीकडे उबेरने लवचिक भूमिका घेतली असतानाच, ओला आणि रॅपिडो या कंपन्यांनी मात्र, या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. भाडेदराबाबत सुरू असलेल्या समस्यांवर या कंपन्यांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने चालकांमध्ये तीव नाराजी आहे, तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. क्षीरसागर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT