Uber Pudhari
पुणे

Uber Driver Murder: माळशेज घाटात उबेर चालकाचा खून; आरोपीला अटक

टिटवाळा ते जुन्नर प्रवासादरम्यान गणेशखिंड परिसरात घडली घटना; न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: माळशेज घाट मार्गावरील सितेवाडी हद्दीतील गणेशखिंड परिसरात उबेर चालकाचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणाचा ओतूर पोलिसांनी वेगाने छडा लावत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील मयत चालकाचे नाव नासीर अहमद सलामतुल्ला अन्सारी (वय २६) असे असून तो मूळ उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील शेरकोट येथील रहिवासी आहे. सध्या तो नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत होता. त्याचा भाऊ मोहम्मद अमीर सलामतुल्ला अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ मार्च २०२६ रोजी ओतूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित पांढऱ्या रंगाची ईर्टिगा (एमएच ०३ डीव्ही ६४०३) या गाडीची माहिती उबेर कंपनीकडून घेतली. त्यावेळी ५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता टिटवाळा येथून जुन्नर येथे जाण्यासाठी ही गाडी आदर्श चंद्रकांत भालेराव (वय २१, रा. टिटवाळा पूर्व, ता. कल्याण, जि. ठाणे) याने ऑनलाईन बुक केल्याचे समोर आले. गाडीचे जीपीएस तपासले असता ती जुन्नर येथे न जाता गणेशखिंड परिसरात थांबून पुन्हा टिटवाळ्याकडे परत गेल्याचे दिसून आले. दरम्यान, ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला बेवारस अवस्थेत सापडलेल्या गाडीत मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळल्याने तपासाला गती मिळाली.

पोलिसांनी संशयित म्हणून आदर्श भालेराव याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत आरोपीने सांगितले की, टिटवाळा येथून जुन्नरकडे जात असताना माळशेज घाटातील गणेशखिंड परिसरात चालकाने लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्यानंतर चालकाने पैशांची मागणी करत चाकूने धमकावल्याचा आरोप आरोपीने केला. यावेळी दोघांमध्ये गाडीतच झटापट झाली. झटापटीदरम्यान आरोपीने चालकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या चालकाचा गाडीतच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने मृतदेह गाडीतून बाहेर काढून सितेवाडी बाजूकडील रस्त्यालगतच्या सिमेंटच्या कठड्यावरून खाली फेकून दिला. त्यानंतर आरोपी गाडी घेऊन माळशेज घाटमार्गे टिटवाळ्याकडे गेला व टिटवाळा–गोवेली दरम्यान गाडी रस्त्यावर सोडून फरार झाला होता.

याबाबत शीक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय एल. जी. थाटे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT