पुणे

वाकड-हिंजवडीत दुचाकीचोर जेरबंद

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  वाकड, हिंजवडी परिसरात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघांकडून 18, तर वाकड पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याकडून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. रवि धांडगे (23) तर विकास धांडगे (दोघेही राहणार पाथरगव्हाण ता. पाथरी, जि. परभणी) अशी हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, वाकड पोलिसांनी कमलेश परदेशी , शुभम निकम पुष्पक पाटील, प्रज्वल भोसले हे चौघेही सध्या चिंचवडमध्ये राहणारे असून मूळ रा. मु. पो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव) येथील आहेत.

पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी हिंजवडी येथील एका कंपनीसमोरून दुचाकी चोरीला गेली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना एक संशयित हिंजवडी परिसरात चोर्‍या करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीचा माग काढत हिंजवडी ते सुपा-अहमदनगर या मार्गावरील तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून रवी धांडगे आणि विकास धांडगे यांना जेरबंद केले. पोलिसांनी विकास याच्याकडून 15 तर रवी याच्याकडून 3 दुचाकी अशा एकूण 5 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 18 दुचाकी जप्त केल्या आहेत.

वाकड पोलिसांचे पथक थेरगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना थेरगाव येथे दोन संशयित दुचाकी दिसल्या. त्यानुसार, पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या असल्याचे उघडकीस आले. त्यांनी वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिंचवड परिसरातून दहा दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

यांनी केली कामगिरी
सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक सुनिल दहिफळे, सोन्याबापू देशमुख, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दुचाकींची गावाकडे विक्री

हिंजवडी पोलिसांनी अटक केलेला आरोपी रवी धांडगे हा परभणी जिल्ह्यातून पांडवनगर परिसरात राहण्यासाठी आला होता. परिसरात दिवसभर रेकी करून तो दुचाकी चोरी करायचा. त्यानंतर चोरीच्या दुचाकींची गावाकडे विक्री केली जात होती. यासाठी आरोपी विकास धांडगे हा त्याला मदत करीत होता. आरोपी विकास हा गावातील शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन गाडीची कागदपत्रे दोन दिवसांत आणून देतो, असे सांगून दुचाकी देत होता. कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याने अनेकांनी दुचाकी खरेदी केल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT