पुणे

मंचर परिसरात चोर्‍या करणारे दोघे जेरबंद; लॅपटॉप व एक पल्सर मोटारसायकल जप्त

अमृता चौगुले

मंचर; पुढारी वृत्तसेवा: मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी चोर्‍या करणार्‍या यशदीप गोविंद कोंढार (वय 24, रा. कळसगाव येरवडा) व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप व एक पल्सर मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रुबाब कलेक्शन व सर्वज्ञ मेडिकल या दुकानाचे 3 ऑगस्ट रोजी शटर उचकटून दुकानातील लॅपटॉप, कपडे, रोख रक्कम व इतर वस्तू मिळून 68 हजार रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला होता.

याबाबतची फिर्याद संदीप टाकळकर (रा. मुळेवाडी, मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच दि. 2 ऑगस्ट रोजी मंचर येथील लक्ष्मी रोड स्टार परमिट रूम अ‍ॅण्ड बार, श्रीकांत किराणा स्टोअर या दुकानांचे शटर उचकटून 31 हजार 150 व आशानंद सोसायटी येथून 25 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी असा एकूण 56 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलिसांनी अगोदर मोहसीन हानिफ शेख (रा. विश्रांतवाडी, प्रतीकनगर, येरवडा, पुणे) याला अटक केली होती. या वेळी त्याचे इतर साथीदार फरार झाले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना मंचर पोलिसांनी फरार आरोपी यशदीप गोविंद कोंडार व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर विश्रांतवाडी व येरवडा पोलिस ठाण्यात चोरीचे व घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा तपास मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

SCROLL FOR NEXT