पुणे

महावितरणची दोन स्विचिंग स्टेशन चाकण एमआयडीसीत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या विकासाला हातभार लावणार्‍या औद्योगिक ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी महावितरण कटिबद्ध आहे. या ग्राहकांसाठी पुणे परिमंडल अंतर्गत एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेंतर्गत विविध एमआयडीसीमध्ये 44 कोटी 70
लाख रुपये खर्चाची विद्युतविषयक कामे सध्या सुरू आहेत. यातील चाकण एमआयडीसीमधील दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे प्रामुख्याने औद्योगिकसह घरगुती व वाणिज्यिक 3 हजार 850 ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.

विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील किंग्फा 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन व ह्युंदाई 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता युवराज जरग, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप बटवाल उपस्थित होते. पवार यांनी सांगितले की, कार्यान्वित झालेल्या दोन स्विचिंग स्टेशनमुळे अतिभारित होत असलेल्या 22 केव्ही क्षमतेच्या नऊ वीजवाहिन्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने उच्च व लघुदाबाच्या 1350 औद्योगिक ग्राहकांसह परिसरातील सुमारे 2 हजार 500 घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

औद्योगिक ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा देण्यासाठी विद्युतयंत्रणा सुधारणा योजनेंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख, तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडी एमआयडीसीमध्ये एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यातील विविध कामांना सुरवात करण्यात आली आहे. या वेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, अमित कुलकर्णी, धनंजय आहेर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश भगत, उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे, सहायक अभियंता विक्रांत वरूडे व संजय बेडदुर्गे हेही उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT