पुणे

निरा उजव्या कालव्याची जूनपर्यंत दोन आवर्तने ; कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  निरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून, दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत तसेच चासकमान प्रकल्पांतर्गत तीन आवर्तने देण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. निरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, दीपक चव्हाण, समाधान आवताडे, भीमराव तापकीर, संजय जगताप, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

निरा प्रकल्पात उपयुक्त साठ्याच्या 47.50 टक्के म्हणजेच 22.96 टीएमसी पाणी उपलब्ध असून, उन्हाळी हंगामात निरा उजव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी 13.93 टीएमसी पाणी व बिगर सिंचनासाठी 14.78 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. त्यानुसार 19 जूनपर्यंत सलग दोन उन्हाळी आवर्तने देण्यात येणार आहेत. माळशिरस, सांगोला, पंढरपूरपर्यंत कालव्याच्या टेलपर्यंत पुरेशा दाबाने पाणी जावे यासाठी जलसंपदा विभागाने यांत्रिकी विभागाच्या साहाय्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. निरा डावा कालवा एका ठिकाणी फुटल्याचा प्रकार घडला होता. ती दुरुस्ती पूर्ण झाली असून, तेथील उर्वरित चार्‍यांना प्राधान्याने सोडण्यात यावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.भामा आसखेड प्रकल्पातून भामा व भीमा नदीत 15 ते 27 मे पर्यंत कृषी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

या वेळी बैठकीस विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, पुणे जलसंपदा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवणी कोल्हे, निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके निरा देवघर डावा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, निरा देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, भामा आसखेडचे कार्यकारी अभियंता नामदेव करे आदी उपस्थित होते.

चासकमान प्रकल्पाची तीन आवर्तने
चासकमान प्रकल्पांतर्गत चासकमान आणि कलमोडी धरणात मिळून एकूण 3.75 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. योग्य नियोजनामुळे उन्हाळी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. 1 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन सुरू आहे. दुसरे आवर्तन 5 मे ते 3 जूनपर्यंत आणि तिसरे आवर्तन 8 मे ते 17 जूनपर्यंत देण्याचे चासकमान कालवा सल्लागार समिती बैठकीत ठरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT