पुणे

पुणे : महावितरणचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इमारतीमध्ये इलेक्ट्रिक मीटर घेण्याकरिता महावितरण कार्यालयात केलेल्या अर्जावर हरकत घेऊन त्यावर अनुकूल अहवाल देण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या विधी सल्लागार आणि सहायक विधी अधिकारी या वर्ग 1 च्या अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सत्यजित विक्रम पवार (विधी सल्लागार) रास्ता पेठ कार्यालय आणि समीर रामनाथ चव्हाण (सहायक विधी अधिकारी) गणेशखिंड कार्यालय अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक मीटर बसवायचे होते. त्यासाठी त्यांनी रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयात अर्ज केला होता.

त्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी संबंधित दोन अधिकार्‍यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे संपर्क साधला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

SCROLL FOR NEXT