पुणे

पुणे : सुटे पैसे देण्याच्या नादात गमावले दोन लाख

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मी डॉक्टर असून, मला पेशंटला द्यायला सुटे पैसे नाहीत, मला बांगड्यांचेही माप द्यायचे आहे, म्हणून एका ठिकाणी सराफाच्या व्यवस्थापकाला बोलावून घेतले. दरम्यान, एकाने याच महिला डॉक्टरचा मुलगा असल्याचे भासवून पेशंटला पैसे देण्याच्या बहाण्याने व्यवस्थापकाने आणलेल्या पैशाची बॅग घेऊन पोबारा केल्याचा 'बनवाबनवी'चा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी डॉ. कुलकर्णीसह तिच्या साथीदारावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमप्रकाश श्यामसुंदर वैष्णव (वय 32, रा. ओम नीलकंठेश्वर बिल्डिंग, वाघोली; मूळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी वाघोली येथील गिरिराज ज्वेलर्स या सराफी दुकानात 20 वर्षांपासून नोकरीस आहेत. ते सध्या येथे व्यवस्थापक आहेत. दि. 9 मे रोजी दुकानावर असताना त्यांना डॉ. कुलकर्णी या महिलेचा फोन आला. त्यांनी दुकानातून बांगड्या बनविण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, तिच्याकडे चार लाख रुपये 2 हजारांच्या नोटा स्वरूपात असल्याचे सांगितले. तसेच ओमप्रकाश यांच्याकडे 2 लाख रुपये सुटे आहेत का? अशी विचारणा करून सुटे पैसे घेऊन येण्यास सांगितले. तिने सांगितल्याने सुटे पैसे घेऊन ओमप्रकाश केअर हॉस्पिटल येथे गेले. तेथे गेल्यावर महिलेला फोन केल्यानंतर तुम्हाला घ्यायला मुलाला पाठवते म्हटल्यानंतर तिने एकाला गेटवर पाठविले.

पहिल्या मजल्यावर ओमप्रकाश यांना नेल्यानंतर त्यांना महिला राहत असलेला फ्लॅट दाखविला अन् याचवेळी सुटे पैसे पेशंटला द्यायचे आहे, असे सांगून त्या आरोपीने पैशाची बॅग घेऊन तो खाली गेला. फ्लॅटमध्ये ओमप्रकाश यांनी जाऊन पाहिले तर फ्लॅटमध्ये कोणतीच महिला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलाला खाली जाऊन पाहिले तर तो देखील तेथे नसल्याने ओमप्रकाश यांनी लोणीकंद पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT