कोंढवा/धनकवडी, पुढारी वृत्तसेवा: बालदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 13) पुण्यातील दोन चिमुकल्यांनी राजगड किल्ला डोळ्यांवर पट्टी बांधून सर केला. अवघ्या चौदा मिनिटांत ते या किल्ल्यावर पोहोचले, याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
धनकवडी येथील नवमहाराष्ट्र स्कूलचा विद्यार्थी भावार्थ दीपक शिळीमकर (वय 10) आणि सरहद स्कूलचा नकुल सुधीर गरूड (वय 10) या दोघांनी बालदिनाच्या पूर्वसंध्येला ही मोहीम आखली. ही जोडगोळी प्रत्येक बालदिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम आखत असते. या वर्षीच्या उपक्रमातीला मोहीम राबविण्यासाठी भावार्थ आणि नकुल यांनी प्रशिक्षण घेतले होते. शिवाय त्यांनी कसून सरावही केला होता. या मेहनतीच्या बळावरच त्यांची ही मोहीम फत्ते झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर जाण्याची मोहीम आखल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होते आहे. आपल्या इतिहासातून आपण प्रेरणा, साहस आणि जिद्द शिकावी म्हणून ही मोहीम आखल्याचे भावार्थ आणि नकुल यांनी सांगितले. योगगुरू दीपक महाराज शिळीमकर म्हणाले की, अशा मोहिमा आखताना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. उघड्या डोळ्यांनी जो बालेकिल्ला सर करताना काळीज हेलावते तो बालेकिल्ला भावार्थ आणि नकुल यांनी डोळ्यावर पट्टी बांधून अवघ्या चौदा मिनिटांत तोही मध्यरात्री सर केला, ही अत्यंत साहसाची गोष्ट आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले.