पुणे

पुण्यातील कात्रज टेकडीलाच सुरुंग

अमृता चौगुले

पुणे : निसर्गरम्य कात्रज टेकडीवर 'हिल्स स्पॉट', बंगलो प्लॉट, जांभूळवाडी 'लेक व्ह्यू' मंगल कार्यालय, लॉज आदीच्या आकर्षक पाट्या जागोजागी झळकत आहेत. कात्रजच्या आगम मंदिरापासून अंजनीनगर, गगनगिरी हिल्स, जांभूळवाडी, दरीपूल या भागात टेकड्या पोखरून प्लॉटिंग वेगाने सुरू असल्याचे 'पुढारी'च्या पाहणीत समोर आले आहे.

प्रामुख्याने महापालिका हद्दीत कात्रज परिसरातील गावांचा समावेश झाल्याने टेकडीवरील गुंठ्यांचे भाव वधारले असून, खुलेआम विक्री सुरू आहे. पाच लाख रुपये गुंठ्याचा दर आता पंधरा लाख रुपये गुंठ्यावर पोहचला आहे. खुलेआम ठिकठिकाणी जेसीबी सुरू आहेत. कारवाईची नोटीस आल्यानंतर सुरुवातीला चार दिवस बंद केले जातात. शासकीय अधिकार्‍यांनी पाठ फिरवली की परत जोरात काम वेग धरत असल्याचे समोर आले आहे. आता महापालिकेच्या हद्दीत सर्व टेकडीचा परिसर आल्याने बांधकामाला परवानगी देण्यात येणार असल्याची बतावणी केली जात आहे. त्या वेळी कात्रज टेकडीवर जागोजागी कंपाउंड वॉल आणि सिमेंटचे खांब लावून प्लॉटिंग दिसून आले.

पर्यावरण अभ्यासकांचाही इशारा

कात्रजपासून पुढे शिंदेवाडी, जांभूळवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, कोळेवाडी या भागांत सध्या मोठ्या प्रमाणात टेकडीफोड सुरू आहे. दिवसरात्र ट्रक, डोंगर पोखरणारी यंत्रे काम करीत आहेत. काही ठिकाणी सुरुंग लावून डोंगर फोडण्यात आला आहे. परिणामी, पावसामुळे चढावरचा मुरूम मोठ्या प्रमाणात घसरून उतारावर आला आहे. काही वर्षांपूर्वी शिंदेवाडी येथे टेकडीफोडमुळे मोठी दुर्घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांत सुरू झालेल्या कामामुळे शिंदेवाडी अपघाताची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे.

– सचिन पुणेकर (पर्यावरण अभ्यासक)

जागेचे दर गगनाला

राज्य शासनाने महापालिका हद्दीत गुजरवाडी, निंबाळकरवाडी, आंबेगाव खुर्द व जांभूळवाडीचा समावेश करण्याची अधिसूचना 29 मे रोजी काढली. त्यामुळे कात्रज डोंगर-टेकडीवरील जागांचा भाव वधारला आहे. महापालिका हद्दीत समावेश झाल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकांच्या एजंटांनी गुंठ्यांचे भाव दुप्पट केले आहेत. प्लॉटला जाण्यासाठी कात्रज महामार्गाच्या दोन्ही बोगद्यांकडून टेकडी पोखरून रस्ते तयार करण्यात आले आहेत.

– सुहास लोणकर (नागरिक)

पुणे महत्त्वाचे शहर

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या सह्याद्री पर्वताच्या अत्यंत जवळच्या मोठ्या शहरांपैकी पुणे हे एक महत्त्वाचे शहर आहे. शहरातील एकूण क्षेत्रफळापैकी 1225 हेक्टर क्षेत्र (5.10 टक्के) 11 टेकड्या आणि त्यावरील उतारांनी व्यापले आहे. त्यात कात्रज टेकडीचा समावेश होतो. नवीन आर्थिक धोरणामुळे पुण्यात उद्योग आले. कामासाठी स्थलांतरित कामगार आले. लोकसंख्या वाढली. त्याचे थेट परिणाम कात्रजच्या टेकडीवर झाल्याचे दिसते.

– अ‍ॅड. दिलीप जगताप (कायदेतज्ज्ञ)

वनीकरण मोहीम राबविण्याची गरज

वनीकरणाची मोहीम राबविण्याची नितांत गरज आहे. प्रदूषण कमी करणार्‍या वनस्पतींच्या प्रजातींची लागवड करावी. प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा, कचरा व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता आहे.

– विजय कुंभार,
(माहिती अधिकार कार्यकर्ते)

जंगलतोड आणि अतिक्रमण

या टेकडीवर बेसुमार वृक्षतोड करून तेथे इमारती बांधण्यात आल्या. टेकड्या फोडून त्यावर अतिक्रमण करण्यात आले.

मातीची धूप

जंगलतोड झाल्याने जमिनीवरील मातीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचे धोके वाढले आहेत.

SCROLL FOR NEXT