पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात 500 मीटर कापड वापरून बनविलेल्या 4.5 फूट उंचीच्या पगडीचे मंगळवारी (दि. 11) लोकार्पण करण्यात आले. या पगडीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅण्ड जीनिअस बुकमध्ये झाली आहे. ही जगातील सर्वात मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अॅन्ड जीनिअस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार सोलंकी, सराफ व्यावसायिक दिलीप सोनिगरा व त्यांचे कुटुंबीय, रामभाऊ कराळे-पाटील, मुकुंद राऊत, शंकर महाराज मराठे, नितीन महाराज काकडे, रवींद्र ढोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
ही पगडी दिलीप सोनिगरा आणि कुटुंबीयांनी संत तुकाराम महाराज संस्थानकडे सुपूर्त केली. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी केले. दिलीप सोनिगरा म्हणाले, श्री संत तुकाराम महाराज यांच्याविषयी असलेल्या नितांत श्रद्धेतून अखंड कापडामध्ये ही पगडी तयार केली आहे. 500 मीटर लांबीच्या कापडामध्ये बनविलेल्या या पगडीची उंची 4.5 फूट आहे. तर, पगडीचा घेराव हा 22 फुटांचा आहे. पगडी बनविण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी लागला. तर, त्याच्या पूर्वतयारीला एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. आम्ही बनविलेल्या पगडीची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने खूप चांगले वाटत आहे. मोरे म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासाठी दिलेली पगडीरुपी भेट ही अनमोल आहे. प्रसिद्ध कारागीर शैलेश यादव यांनी ही पगडी तयार केली आहे. ही पगडी दर्शनासाठी व सर्व भक्तांना पाहण्यासाठी खुली आहे.