देहूरोड; पुढारी वृत्तसेवा : आपल्या निष्ठेला तडा देण्याचे काम इतर शक्तींकडून होत आहे. त्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी धार्मिक मार्गातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केले. देहू येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्या बोलत होत्या. या वेळी देहू संस्थान विश्वस्त माणिकमहाराज मोरे, अजितमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, प्रशांतमहाराज मोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त अॅड. माधवी निगडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शैलजा खंडागळे, शिवसेना पदाधिकारी युवराज कोकाटे, गुलाब गरुड, प्रकाशमहाराज जवंजाळ, शिवाजीराव मोरे, आळंदी शिक्षण संस्थेचे नरहरीमहाराज चौधरी, शांताराममहाराज निम्हण, विलास बालवडकर आदी उपस्थित होते.
मोबाईलने मुलांना लागावी अध्यात्माची गोडी
डॉ. गोर्हे म्हणाल्या, की संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हला दिलेल्या 80 टक्के समाजकारण करण्याच्या शिकवणीनुसार आम्ही काम करत आहोत. मुलांच्या हातून मोबाईल सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने याच मोबाईलच्या माध्यमातून मुलांना अध्यात्माची गोडी लागणे गरजेचे आहे.