पुणे

जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : युगेंद्र पवार

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शहर, तालुक्यातील अनेक नागरिकांनी समस्या सांगितल्या होत्या. त्या आमच्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. मंगळवारी (दि. 14) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांना नागरिकांकडून विविध कामांसंबंधी निवेदने देण्यात आली. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, प्रचारादरम्यान समाजातील विविध घटकांनी काही समस्या मांडल्या होत्या. नोकरी, प्रवेश अशी कामे त्यात अधिक आहेत.

ती सोडविण्याचा प्रयत्न राहील. पक्ष कार्यालयात सुरू केलेला वैद्यकीय मदत कक्ष चांगले काम करीत आहे. कक्ष सुरू केल्यापासून आजवर 20 लाखांपर्यंतची मदत गरजूंना मिळवून दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सक्रिय राजकारणात उतरणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. निवडणुकीनंतर माझ्या कुटुंबातील सदस्य परदेश दौ-यावर जातील, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यावर युगेंद्र म्हणाले, मी बारामतीचा आहे. इतर कोणाला परदेशात जायचे असेल तर त्यात गैर काही नाही.

सीसीटीव्ही बंद ही गंभीर बाब

बारामती लोकसभेसाठी जे मतदान झाले, त्याच्या ईव्हीएम ज्या स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळासाठी बंद होते, अशी तक्रार शरद पवार गटाने केली होती. यावर युगेंद्र पवार म्हणाले, अगोदरच लोक ईव्हीए बद्दल शंका उपस्थित करीत आहेत. त्यात सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडणे ही गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग व त्यांच्या यंत्रणेने यासंबंधी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT