आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन pudhari
पुणे

18th Tribal Film Festival: संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल: पंडित विद्यासागर

बहुरंग आयोजित 18व्या आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आदिवासी समाजासंदर्भातील संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी समाज, त्यांची संस्कृती टिकण्यासाठी मदत होईल, असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. विद्यापीठांमधील भाषा विभाग, ललित कला केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती, बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

बहुरंग, पुणेतर्फे आयोजित 18 व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (दि.19) पंडित विद्यासागर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. हा महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये (घोले रस्ता) आयोजित करण्यात आला आहे. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी, आदिवासी संस्कृती अभ्यासक ग. श. पंडित उपस्थित होते. राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन केले आहे.

पंडित विद्यासागर म्हणाले, विस्थापन, मुलभूत सुविधा, आर्थिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण हे आदिवासी समाजासमोरील मुख्य प्रश्न आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याविषयी दोन प्रवाह आहेत. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्यास त्यांची संस्कृती कशी टिकणार, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात न आणल्यास त्यांचा विकास कसा साधणार असे प्रश्न उपस्थित केले जातात. आदिवासी प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात.

सरकारस्तरावर आदिवासी विभाग आहेत. पण, आदिवासी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी या विभागाकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत, असे डॉ. केदारी यांनी सांगितले.

उद्घाटनानंतर विविध लघुपट दाखविण्यात आले. महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपट निर्मात्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. श्रीकृष्ण देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आभार धीरज केदारी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT