पुणे

दापोडी-निगडी मार्गाचा ‘अर्बन स्ट्रीट’द्वारे कायापालट

अमृता चौगुले

पिंपरी : महापालिकेने शेकडोच्या संख्येने घरे व दुकाने तोडत दापोडी ते निगडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा प्रशस्त असा ग्रेडसेपरेटर मार्ग तयार केला. त्यानंतर 15 वर्षांने पदपथ, सायकल ट्रॅक व सुशोभीकरणासाठी या रस्त्यांवर तब्बल 170 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. एकसमान पदपथ व सुशोभीकरणामुळे या मुख्य मार्गावरून ये-जा करताना वाहनचालक व पादचार्‍यांना सुखद अनुभव मिळेल, असा दावा महापालिकेने केला आहे.

दापोडीच्या हॅरिस पूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या मार्गावर आता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार एकसमान रचनेचे पदपथ तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यांची रुंदी कमी न करता आणि एकही झाड न तोडता पदपथ सुशोभित केले जाणार आहेत. गरज असेल तेथे नव्याने झाडे लावण्यात येणार आहेत. मार्गावर काही ठिकाणी बसण्यासाठी आकर्षक रचनेचे बाक असतील.

त्यामुळे पादचार्‍यांना या मार्गावर सुरक्षितपणे चालता येणार आहे, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. तसेच, भित्तीचित्र व आकर्षक चित्रे लावून परिसर सुशोभित केला जाणार आहे. एकसमान आकाराचे एलईडी दिव्यांचे विद्युत खांब उभारण्यात येणार आहेत. रस्त्यांवर लाल रंगाचे पट्टे मारून सायकल ट्रॅक केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात हॅरिस पूल ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे.

पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या बाजूचे काम केले जाणार आहे. स्थापत्य व विद्युत विभाग हे काम एकाच वेळी एकत्रित पद्धतीने करणार आहे. रस्त्यांची एकसमान रचना व सुशोभिकरणामुळे वाहनचालक व पादचार्‍यांना या मार्गावर प्रवास करताना सुखद अनुभव मिळणार आहे. पायी चालण्यास व सायकल वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

अतिक्रमणे वाढल्याने प्रशस्त रस्ता वाहतुकीस अपुरा पडतोय

शहरातील दापोडी ते निगडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा 183 फूट (63 मीटर) रुंदीचा 8 पदरी प्रशस्त असा रस्ता सन 2004 त 2008 या काळात तयार करण्यात आला. रस्ता करताना महापालिकेस प्रचंड विरोध सहन करावा लागला. इतक्या मोठ्या रुंदीच्या रस्त्यांची गरज का आहे, असे प्रश्न त्या वेळी केले गेले होते. दापोडी ते निगडी या मार्गावर कोठेचे सिग्नल नसल्याने सिग्नल फ्री वाहतूक करता येईल, असा दावा अधिकार्‍यांनी केला होता. या मार्गावर देशातील पहिला दुहेरी बीआरटी बससेवा सन 2018 ला सुरू झाली. या मार्गाचे राज्यात नव्हे तर, देशात कौतुक झाले. मात्र, अद्याप हा रस्ता सिग्नल फ्री झालेला नाही.

त्यामुळे अधिकार्‍यांचा दावा फोल ठरला आहे. नाशिक फाटा व फुगेवाडी येथे असे दोन सिग्नल या मार्गावर आहेत. मर्ज इन व मर्ज आऊटमधून कोणीही कसेही आत-बाहेर करीत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. नाशिक फाटा येथील लुप अद्याप वाहतुकीस खुला झालेला नाही. रस्त्यांवर कोठेच सुरक्षित वाहनतळाची व्यवस्था नाही. सिग्नल यंत्रणा कुचकामी आहे. अनेक भुयारी मार्गातून बस व ट्रॅक ये-जा करून शकत नाहीत. 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीचे वाहने वारंवार ग्रेडसेपरेटरमध्ये अडकतात. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने गुडघ्याभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागतो. पदपथ वारंवार खोदले गेल्याने पादचार्‍यांना व्यवस्थित व सुरक्षितपणे चालता येत नाही. तर, अनेक ठिकाणी पदपथच गायब आहेत.

टपर्‍या, विक्रेते, पत्राशेड, दुकाने, ऑटो स्पेअर पार्ट, जुने कारविक्रेत्यांचे अतिक्रमणे वाढल्याने हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. मेट्रोच्या कामामुळे काँक्रीटचे रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. दापोडी ते चिंचवडच्या मदर टेरेसा पुलापर्यंतच्या दुभाजकामध्ये झाडे न लावल्याने कचरा साचत आहे. चौकाचौकांत फ्लेक्स व बोर्ड लावले जात असल्याने वाहतुकीस अडथळा होतो. त्यामुळे शहर विद्रुप
दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील काम

दापोडीतील हॅरिस पूल ते पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक- दोन्ही बाजू
खर्च : स्थापत्य 94 कोटी 79 लाख
विद्युत 15 कोटी 37 लाख
दुसर्‍या टप्प्यातील काम
पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक
खर्च : स्थापत्य 50 कोटी 7 लाख
विद्युत 9 कोटी 74 लाख
एकूण खर्च : 169 कोटी 98 लाख

दोन टप्प्यात केले जाणार काम

शहरातील सर्वच रस्ते अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार विकसित केले जात आहेत. त्या धर्तीवर दापोडी ते निगडी या शहरातील मुख्य मार्गाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. गर्द झाडी असलेल्या या प्रशस्त मार्गावर एकसमान आकाराचे पदपथ आणि सुशोभिकरण केल्याने या मार्गास आकर्षक 'लूक' मिळणार आहे. त्यातून नागरिकांना सुरक्षितपणे पायी ये-जा करता येणार आहे. हे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून, लवकरच निविदा काढली जाणार आहे, असे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

केवळ पालिकेचे एकसमान जाहिरात होर्डिंग

नवीन बाह्य जाहिरात धोरणानुसार दापोडी ते निगडी या मार्गावर केवळ महापालिकेचे एकसमान आकाराचे जाहिरात होर्डिंग लावण्यात येणार आहेत. ते होर्डिंग खासगी भागीदारीतून पीपीपी तत्वावर उभारले जाणार आहे. होर्डिंग उभारणे, त्यावर जाहिरात करणे, वीज पुरवठा, त्याची सुरक्षा आदी सर्व जबाबदारी संबंधित एजन्सीची असणार आहे. त्यासाठी 5 वर्षे कालावधीसाठी करार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागास काहीही खर्च न करता निश्चित उत्पन्न मिळणार आहे. तसेच, त्या होर्डिंगवर महापालिकेच्या जाहिरातीही झळकणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT