Pune Baner Police Station Constable
पुणे: बाणेर पोलिस ठाण्यातील शिपायाच्या खुर्चीप्रतापाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह पाच जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये दोन महिला अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचार्यांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 21) रात्री याबाबतचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले.
दरम्यान, दैनिक ‘पुढारी’ने ‘पद शिपायाचे अन् आव इन्स्पेक्टर’चा या मथळ्याखाली ‘ऑफ द रेकॉर्ड’ या सदरात वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार समोर आणला होता. त्याच वृत्ताची दखल घेत आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
बाणेर पोलिस ठाण्यात हे शिपाई नेमणुकीला आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या खुर्चीत बसलेला त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. तसेच, शिपायाचे पोलिस ठाण्याच्या समोरच हॉटेल आहे. ते पहाटेपर्यंत सुरू असल्याचे सुद्धा पुढे आले होते.
परंतु, वरिष्ठांच्या मर्जीतील हे शिपाई असल्यामुळे त्यांच्यावर कोणी कारवाई करताना दिसून येत नव्हते. दैनिक ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलिस ठाण्यात फर्निचरचे काम सुरू होते. साहेबांची खुर्ची आणि टेबल व्यवस्थित बसले आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी संबंधित पोलिस शिपाई खुर्चीवर बसल्याचा दावा वरिष्ठ अधिकार्यांनी केला होता.