पुणे

पुणे : अनुसूचित जातीच्या उमेदवारांना स्टार्ट-अपसाठी प्रशिक्षण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थांमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांना उद्योजक बनण्यासाठी व स्टार्ट- अपसाठी 6 महिन्याचे प्रशिक्षण अनुषांगिक उपक्रमांद्वारे देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी दिली आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था सन 1988 पासून उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्य करणारी महाराष्ट्र शासनाची एक अग्रणी स्वायत्त प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत महाराष्ट्रातील 18 ते 45 वयोगटातील लाखो युवक व युवतींना 100 हून अधिक स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे.

त्यातील बहुतांश प्रशिक्षणार्थीना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी मार्गदर्शन पुरविण्यात आले असून, नवउद्योजकांना स्वतःचे उद्योग सुरु करण्यात यश आले आहे. या प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणार्‍या अनुसुचित जातीतील उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे (9403078752) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT