Pooja Khedkar mother
शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवणाऱ्या मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक  File Photo
पुणे

IAS Officer Pooja Khedkar : शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवणाऱ्या मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने पाचाड येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. त्यांच्यासोबत पोलिसांचे तीन पथक पुण्याकडे रवाना झाली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे एसपी पंकज देशमुख यांनी दिली.

मुळशीतील घडवली गावात शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय ६५, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सोमवारी सकाळी बाणेरमधील खेडकर यांच्या बंगल्यावर धडकले होते. मात्र, कारवाईची कुणकुण लागल्यामुळे खेडकर दाम्पत्य थांबले नसल्याचे आढळून आले. मनोरमा दिलीप खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खेडकर यांच्यासोबत शेतकऱ्यांना धमकाविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकांविरुद्ध (बाऊन्सर) गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचाही समावेश आहे.

महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री ३ वा. च्या सुमारास पाचाड येथील पार्वती निवास या घरातून मनोरमा खेडकर व त्यांच्या समवेत असणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी ९ वाजता महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील माहिती पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून देण्यात आली.

SCROLL FOR NEXT