पुणे

पुणे: पालखी महामार्गावरून धोकादायक वाहतूक, वाहतूक कोंडी झाली नित्याचीच; अपघातांचेही प्रमाण वाढले

अमृता चौगुले

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग हा जेजुरी औद्योगिक वसाहतीपासून अरुंद असून, या महामार्गाच्या दोन्ही बाजूस तीव्र उतार आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्यावरून अवजड वाहनांची मोठी वर्दळ आहे. सध्या हा महामार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला असून, अपघातांना आमंत्रण देत आहे. त्यात आता भरीस भर म्हणून ऊस वाहतूक सुरू आहे. काही बेशिस्त चालकांकडून ट्रॅक्टर-ट्रॉली थेट महामार्गामधून नेल्या जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सोबतच अपघातांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. मात्र, याकडे पोलिस प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

कारखान्यांचा ऊसतोडणी हंगाम सुरू असल्याने वाल्हे, जेजुरी, निरा, पिसुर्टी, मांडकी, जेऊर आदी परिसरातील बागायती गावांतून मोठ्या संख्येने, ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊसवाहतूक वाढली आहे. बहुतांश ऊसवाहतूक पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाने होत आहे. मात्र, उसाची धोकादायक वाहतूक ही अपघातांना निमंत्रण देणारी ठरू लागली आहे. पालखी महामार्ग हा जेजुरी औद्योगिक वसाहतीपासून अरुंद आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूसही तीव्र उतार आहे. त्यातच या महामार्गाने अवजड व प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ आहे.

काही ऊसवाहतूक करणारे वाहनचालक मागील वाहनांची फिकीर न करता विनारिफ्लेक्टर, विनाक्रमांकाची वाहने दामटत आहेत. विशेषत: ट्रॅक्टर-ट्रॉलीतून होणारी ऊसवाहतूक डोकेदुखी ठरत आहे. काही ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डरवर गाणी लावून महामार्गाच्या मधोमध ट्रॅक्टर चालवीत आहेत. त्यामुळे ओव्हरटेक करताना दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांची कसोटी लागत आहे. ट्रक व बैलगाड्यांबाबतीतही तसेच सुरू आहे.

महामार्ग अरुंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांना महामार्गाचा अंदाज येत नाही. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. मात्र, अशी धोकादायक ऊसवाहतूक करणार्‍या वाहनचालकांना याची कोणतीच फिकीर नाही. त्याकडे पोलिस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT