‘फटाका’ सायलेन्सरला वाहतूक पोलिसांचा ‘फटका’  Pudhari
पुणे

‘फटाका’ सायलेन्सरला वाहतूक पोलिसांचा ‘फटका’

बारामतीत दोन दिवसांत बुलेटचे 13 सायलेन्सर जप्त

पुढारी वृत्तसेवा

बारामती: स्वच्छ, सुंदर व हरित बारामती शहरात आता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. कर्कश आणि मोठा फटाका आवाज असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेन्सर जाग्यावरच काढून कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत सुमारे 13 गाड्यांचे सायलेन्सर जमा करून वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बारामती वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त घातली आहे. अनेक दंडात्मक कारवाया करत बेशिस्त वाहनचालकांचे मन परिवर्तन केले आहे. मात्र, एवढे करूनही कायद्याचे आणि शिस्तीचे भान नसलेल्या दुचाकीस्वारांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना परिश्रम घ्यावे लागत आहेत.

सध्या शहरातील वेगवेगळ्या भागांत आणि महाविद्यालय परिसरात तरुणांकडे आणि काही चांगल्या लोकांकडे देखील बुलेट गाड्या वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, कंपनीने दिलेल्या या गाड्यांमध्ये मनाप्रमाणे बदल करून या गाड्या ‘मॉडिफाय’ करण्याकडे टुकार तरुणांना रस आहे.

त्यामुळे कंपनीचे सायलेन्सर काढून त्या जागी फटाका सायलेन्सर टाकून ही वाहने शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठा आवाज काढत फिरतात. याचा नाहक त्रास लहान मुले, वयोवृद्ध, मुली, आजारी रुग्णांना होतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना केल्या, दंडही केले; मात्र टुकार तरुणांना याचा कसलाही फरक पडत नाही.

त्यामुळे अशा टुकारांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने वेगळीच मोहीम हाती घेतली आहे. बारामती शहरातील चौका-चौकात नाकाबंदी करून अशा बुलेटचे सायलेन्सर जागेवरच काढून घेऊन किंवा ही वाहने थेट वाहतूक शाखेच्या दालनात नेऊन त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत काढलेल्या फटाका सायलेन्सरच्या जागी दुसरा विना आवाजाचा सायलेन्सर बसवला जात नाही, तोपर्यंत अशी वाहने ताब्यात दिली जात नाहीत.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस जवान सुधाकर जाधव, रेश्मा काळे, प्रदीप काळे, स्वाती काजळे, योगेश कातवारे, जलद कृती दलाचे जवान अशोक मोरे, शिवाजी बरकडे, योगेश पळसे, अजय आहेर, हैदर जमादार, सुदर्शन कदम, सुभाष डोंबाळे, प्रिया पावडे, प्रियांका पोफळे, श्रद्धा थोरात, अजिंक्य कदम, सुभाष काळे, अशोक झगडे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT