बारामतीतील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण Pudhari
पुणे

Bramati Traffic Jam: बारामतीतील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण

पार्किंगची समस्या; अतिक्रमणांमुळे वाहतुकीवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

बारामती: पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीसाठी बारामती शहरात विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होत आहे. सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शहरातील चौक गर्दीने फुलू लागले आहेत.

याशिवाय माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याने गेल्या आठ दिवसांपासून प्रशासकीय भवनमध्येही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने बारामती शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. (Latest Pune News)

शहरातील स्टेशन रोड, गांधी चौक, महावीर पथ, सिनेमा रोड, भिगवण चौक, अहिल्यादेवी चौक, कारभारी चौक, शिवाजी चौक, गुणवडी चौक येथे वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चौकांमध्ये वाहतूक कोंडीची स्थिती चिंताजनक आहे. वाहतूक पोलिस गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी वाहनांची प्रचंड संख्या आणि पार्किंगची समस्या यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

विविध कामांसाठी बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, अहिल्यानगर आदी भागातून येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. याशिवाय तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात. त्यांची वाहने लावण्याची मोठी समस्या आहे. शहरात अतिक्रमणे वाढली आहेत. फळविक्रेते व इतर हातगाडे विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.

शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने लावली जात असल्याने बारामतीकरांची वाहतूक समस्येतून लवकर सुटका होण्याची शक्यता नाही. अनेकांनी परवानगीशिवाय रस्त्यावरच थेट दुकाने थाटली आहेत. शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एकंदरीतच वाहतूक कोंडीला बारामतीकर वैतागले आहेत.

भिगवण रस्त्याचे काम कायमच सुरू आहे. या कामामुळे तेथे लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आल्या आहेत. परिणामी श्रीरामनगरजवळील चौक, अभिषेक हॉटेलनजीकचा चौक आणि सीटीईन हॉटेलनजीकच्या चौकात वाहनचालकांची मोठी तारांबळ होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT