पुणे : पेट्रोलपंप परवानगीसाठी ३.५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपावरून दौंड नगरपरिषदेतील नगररचना सहायकावर दौंड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सुरुवातीला चार लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत 36 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोलपंप डीलरशिपसाठी अर्ज केला होता. सदर पेट्रोलपंप उभारणीसाठी लागणारी जमीन ही लालचंद लुंड (वय ७३) यांच्या मालकीची असून ती तक्रारदाराने २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतली आहे. या कामासाठी आवश्यक असलेली एनए परवानगी व बांधकाम परवाना मिळवण्यासाठी लुंड यांनी २ जानेवारी रोजी दौंड नगरपरिषदेच्या नगररचना विभागाकडे अर्ज दाखल केला होता.
वयोवृद्ध असल्यामुळे लुंड यांनी तक्रारदार यांना अधिकृतरित्या प्रतिनिधी म्हणून अधिकृत केले होते. त्यानुसार ३ जानेवारी रोजी विजयकुमार हावशेट्टे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यानंतर संबंधित अहवाल तयार करून टेन्टेटिव्ह लेआउट, फायनल लेआउट आणि परवाने देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ३.५० लाखांवर आली.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी हावशेट्टे यांनी तक्रारदाराकडे लाच रक्कम मागितल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले. ही लाच रक्कम स्वतःसाठी आणि तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासाठी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार हावशेट्टे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.