पुणे

सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  प्रजासत्ताक दिनापासून रविवारपर्यंत (दि. 28) लागोपाठ तीन दिवसांच्या सुट्यांमुळे सिंहगड, राजगड किल्ल्यासह खडकवासला धरण चौपाटी, पानशेत धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. खडकवासला धरणाच्या तीरावरील गोर्‍हे बुद्रुक येथील वेगाने जाणार्‍या मोटारीची दोन दुचाकींना धडक बसून पाच जण जखमी झाले. तर सिंहगड घाट रस्त्याच्या चिंचेच्या बनाजवळील उतारावर मोटरीचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

दोन दिवसांत सिंहगडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून वनविभागाने अडीच लाखांचा टोल गोळा केला. रविवारी सकाळपासून सिंहगडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडीचा पर्यटकांना सामना करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक संदीप कोळी, सुरक्षारक्षक नितीन गोळे,
रमेश खामकर आदी घाट रस्त्यावर तळ देऊन होते.

दिवसभरात वाहनचालक पर्यटकांकडून वनविभागाने तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचा, तर शनिवारी 1 लाख 27 हजार रुपयांचा टोल गोळा केला. गडावरील वाहनतळ फुल्ल झाल्याने टप्प्य्या-टप्प्याने वाहने सोडण्यात आली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही नाक्यांसह घाट रस्त्यात ठिकठिकाणी सुरक्षारक्षक तैनात केले होते. राजगड किल्ल्यावरही दोन हजारांवर पर्यटकांनी गर्दी
केली होती.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगडकडे वेगवेगळ्या दोन दुचाकीवरून पुण्यातील जगदाळे कुटुंबीय चालले होते. त्या वेळी गोर्‍हे बुद्रुक येथील एक्वेरियस हॉटेलजवळ पुण्याकडे वेगाने जाणार्‍या मोटारीची या दोन दुचाकींना धडक बसली. या अपघातात भाग्यश्री जगदाळे, सर्वेश जगदाळे, सक्षम जगदाळे, रोहिणी गुंड व सचिन जगदाळे हे पाच जण जखमी झाले. सचिन जगदाळे हे गंभीर जखमी झाले आहेत.

आपत्ती व्यवस्थापनचे चोंढे, तानाजी भोसले यांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. जखमीना खडकवासला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सचिन यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंहगड घाट रस्त्यावर चिंचबनाच्या जवळीव तीव्र उताराच्या वळणावर गडावरून पुण्याकडे माघारी चाललेल्या मोटारीचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने कार कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात चालकासह तिघे जण जखमी झाले.

हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही अपघात प्रकरणी हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार संतोष तोडकर तपास करत आहेत. तोडकर म्हणाले, 'याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.'

परत जाणार्‍या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी
खडकवासला धरण चौपाटीसह पानशेत धरण परिसर रविवारी पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. सिंहगड, पानशेत परिसरातील हॉटेलमध्ये शुक्रवारपासून पर्यटक मुक्कामी होते. रविवारी दुपारनंतर पर्यटक माघारी फिरले. त्यामुळे पुणे-पानशेत रस्त्यावर दुपारपासून मोठी वाहतूक कोंडी सुरू झाली होती. डोणजे, गोर्‍हे बुद्रुक , डीआयडी, खडकवासला चौपाटीपासून कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदेड फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT