वेल्हे : प्रजासत्ताक दिनानिमित रविवारी (दि. २६) राजगड किल्ल्यावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. गडावर ८ हजाराहून अधिक पर्यटक होते. यातच फिरण्यासाठी आलेल्या अनिल विठ्ठल आवटे (वय १८) या पर्यटकाचा पाली दरवाजाजवळ गड उतरत असताना बुरुजाचा दगड डोक्यात पडून मृत्यु झाला.
अनिल याच्या डोक्यावर दगड पडताच त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी वेल्हे ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले होते. मात्र वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी अनिल त्यास मृत घोषित केले.
याबाबत डॉ. हिरास यांनी सांगितले की, अनिल याच्या डोक्याला जबर जखम मार लागला होता तसेच कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. मयत अनिल आवटे हा खादगाव भाबट (ता. सेलू, जि. परभणी) येथील आहे. पोलीस भरतीच्या तयारीसाठी धायरी येथे तो चुलत्याकडे राहत होता व धायरी येथेच पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी खासगी क्लासेसमध्ये तयारी करत होता. प्रजासत्ताक दिन असल्याने याच प्रशिक्षण संस्थेच्या इतर सहकाऱ्यांसमवेत अनिल हा राजगड किल्ला फिरण्यासाठी आला होता आणि डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास वेल्हे पोलीस करत आहेत.