भारतीय विद्यापीठांमध्ये उत्कृष्ट संशोधन कार्य करणार्या विद्वानांना आता विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून ‘पीएच.डी. एक्सलन्स अॅवॉर्ड’ पुरस्कार मिळणार आहे. त्यासाठी यूजीसीने देशातील टॉप 10 पीएच.डी. प्रबंध निवडण्याचा निर्णय घेतला आहे, त्या संशोधन प्रबंधकांना आता देशात वेगळी ओळख मिळणार आहे.
भारतातील तसेच जगभरातील विद्यार्थी आणि शिक्षक ‘पीएच.डी. एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्राप्तकर्त्यांच्या संशोधन कार्याबद्दल जाणून घेऊ शकतील. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार म्हणाले, 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या यूजीसीच्या बैठकीत भारतीय विद्यापीठांमधील उत्कृष्ट पीएच.डी. संशोधन कार्याला मान्यता देण्यासाठी ‘पीएच.डी. एक्सलन्स सायटेशन्स’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूजीसीच्या या निर्णयाबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहे.
विविध विषयांतील उत्कृष्ट डॉक्टरेट संशोधनाला मान्यता देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणात संशोधन कार्य आणि नावीन्यपूर्ण उपक्रमावर अधिक भर देण्यात आला आहे.
विज्ञान (कृषी विज्ञान, वैद्यकीय विज्ञानांसह), ‘अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान’, ‘सामाजिक विज्ञान’ (शिक्षण आणि मानविकीसह), भारतीय भाषा, ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रवाह’ या पाच विद्या शाखांमधून टॉप 10 प्रबंध निवडण्यात येणार आहेत. या पाच विद्या शाखांमधून दरवर्षी 2-2 पीएच.डी. प्रबंध निवडले जातील. देशातील केंद्रीय विद्यापीठे, सर्व राज्य विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि डीम्ड विद्यापीठांमधील संशोधन अभ्यासकांना या निवडप्रक्रियेत समाविष्ट केले जाणार आहे.
या उपक्रमात दोनस्तरीय निवड प्रक्रिया असेल. विद्यापीठ स्तरावर एक स्क्रीनिंग समिती असेल आणि विद्यापीठाच्या शिफारशींवर यूजीसी निवड समिती निर्णय घेईल. उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी आणि यूजीसीकडे शिफारशी पाठवण्यासाठी विद्यापीठ स्वतःची स्क्रीनिंग समिती तयार करेल. यूजीसीद्वारे एक अॅप्लिकेशन पोर्टल तयार केले जाईल, ज्यावर विद्यापीठे निवडलेल्या अर्जांची माहिती देतील. विजेत्यांना दरवर्षी शिक्षकदिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी गौरविण्यात येणार असल्याचे देखील यूजीसीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.