पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 10 मार्चपर्यंत पहिली मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी आज सोमवार (दि.10) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत (दि.9) 61 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेत अद्यापही 40 हजारांवर जागा शिल्लक असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला दुसरी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा राज्यातील आठ हजार 853 शाळांमधील एक लाख नऊ हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी तीन लाख पाच हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे एक लाख एक हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 960 शाळांमध्ये 18 हजार 498 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 61 हजार 573 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 18 हजार 161 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. यातून आत्तापर्यंत 10 हजार 573 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण शाळा: 8863
असलेल्या जागा: 109087
बालकांचे अर्ज: 305152
सोडतीमधून प्रवेश जाहीर: 101967
रविवारपर्यंतचे प्रवेश: 61016
अद्याप रिक्त जागा: 40951