पुणे: आनंदी वातावरण ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईदनिमित्त मुस्लिम कुटुंबांमध्ये दिसून येत आहे. रविवारी (दि. 30) चंद्रदर्शन झाल्याने आज सोमवारी (दि. 31) रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय सिरत कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी मोठ्या उत्साहात ईद साजरी होणार असून, मुस्लिम समाजबांधवांनी ईदची जय्यत तयारी केली आहे.
सिरत कमिटीने ईदनिमित्ताने मुस्लिम समाजबांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी सकाळी मशिदींमध्ये नमाजपठण असून, पुण्यातील ईदगाह मैदानावरही सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाजपठण होणार आहे. तसेच, ईदनिमित्त घराघरांमध्ये बिर्याणीसह शिरकुर्माची मेजवानी असणार आहे.
रविवारी (दि. 30) सिरत कमिटीची बैठक झाली. त्यात रविवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे सोमवारी (दि. 31) ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सिरत कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख यांनी दिली. मौलाना गुलाम अहमद कादरी, मौलाना निजामुद्दीन, हाफीज जावेद, हाफीज ऐजाज, मौलाना जमीरुद्दीन, हाफीज सय्यद माजीद आदी बैठकीला उपस्थित होते.
नवीन कपडे परिधान करून मुस्लिम बांधव ईद साजरी करणार आहेत. शहर आणि उपनगरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार सामूहिक नमाजपठणाचे आयोजन केले आहे. कोंढवा, वानवडी, हडपसर, खडकी, कॅम्प परिसर, औंध, बोपोडी आदी ठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये नमाजपठण होणार आहे.
काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. ईदच्या निमित्ताने पुणे-सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानात रविवारी सकाळी नऊ वाजता नमाज अदा होईल. त्यासाठीची तयारीही करण्यात आली आहे. हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाजपठण करणार आहेत, अशी माहिती ईदगाह मैदान कमिटीचे जैनूल काझी यांनी दिली.
घरोघरी आकर्षक सजावट
रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम नागरिकांच्या घरी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. घरोघरी रमजान ईद निमित्ताने आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच, घरही उत्साहाने सजविण्यात आले आहे.
बाजारपेठांमध्ये गर्दी
ईदच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 30) विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. नवीन कपड्यांच्या खरेदीसह मुस्लिम बांधवांनी खाद्यपदार्थांचीही खरेदी केली. कॅम्प, कोंढवा, वानवडी, खडकी येथील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहयला मिळाली.