smart meter Pudhari
पुणे

Smart Meter MSEDCL: स्मार्ट/ टीओडी मीटर बसवा आणि दिवसा वीजवापरावर 80 पैसे सवलत मिळवा

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुढारी वृत्तसेवा

पुणे : टीओडी वीजमीटर बसविणार्‍या वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळातील दिवसा वीजवापरावर 80 पैसे प्रतियुनिट सवलत दिली जाते. या सवलतीपोटी जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत पुणेकरांना आठ कोटी 60 लाखांचा फायदा झाला आहे. त्यांच्या दरमहाच्या वीजबिलात ही सवलत जमा झाली आहे. स्मार्ट/ टीओडी वीजमीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण पुणे परिमंडलात वीजग्राहकांची संख्या 39 लाख 71 हजार इतकी असून, त्यापैकी नऊ लाख 84 हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीजमीटर बसविले आहे, तर उर्वरित ग्राहकांना हे अत्याधुनिक मीटर लवकरच बसविले जात आहे. वीजमीटर बसविण्याची सुरुवात महावितरणने स्वत:पासून केली. महावितरणच्या सर्व आस्थापना व कर्मचारी वसाहतींना हे मीटर लावण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सर्व सरकारी कार्यालये, शासकीय वसाहती आदींनाही हे मीटर बसविले आहे. हे मीटर पूर्णत: मोफत असून, त्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

सवलत का दिली जाते ?

महावितरणला लागणार्‍या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. या स्वस्त विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणार्‍या वीजदरावर प्रतियुनिट 80 पैसे याप्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत 1 रुपया प्रतियुनिटपर्यंत जाणार आहे. ह्या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे क्रमप्राप्त आहे.

कोणत्या मंडलामध्ये जास्त फायदा ?

पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्ता पेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यांपैकी गणेशखिंड शहर मंडलात तीन लाख 66 हजार 867 टीओडी मीटर आहेत. रास्ता पेठ शहर मंडल दुसर्‍या क्रमांकावर असून, या मंडलात तीन लाख 63 हजार 742 टीओडी मीटर ग्राहक आहेत, तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये दोन लाख 54 हजार 353 टीओडी मीटर/ ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणार्‍या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- 3 कोटी 69 लाख 34 हजार 2 रुपये, रास्ता पेठ- 3 कोटी 53 लाख 62 हजार 659 रुपये, तर पुणे ग्रामीण - 1 कोटी 37 लाख 75 हजार 560 रुपये सवलत मिळाली आहे.

काही ठिकाणी नवीन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही, तर ते अचूक असेल. ग्राहकांनी ऐकीव किंवा सोशल मीडियावर आलेल्या अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे.
सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT