अचूक वीजबिलासाठी टीओडी मीटर महत्त्वाचे; ग्राहकांनी सहकार्य करावे, महावितरणचे आवाहन File Photo
पुणे

Smart Meter: अचूक वीजबिलासाठी टीओडी मीटर महत्त्वाचे; ग्राहकांनी सहकार्य करावे, महावितरणचे आवाहन

असे आवाहन महावितरणने केले आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महावितरणकडून वीज ग्राहकांना टीओडी (टाईम ऑफ डे) वीजमीटर मोफत बसवले जात आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या चार लाखांहून अधिक ग्राहकांना वीजमीटर बसविण्यात आले असून, त्यांचे अचूक वीजबिल तयार होत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी मीटर बसविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज ग्राहकांना त्यांचे वीजबिल त्यांच्या वापरानुसार अचूक व वेळेत मिळावे, ही अपेक्षा असते.बदलत्या युगात बहुतांश गोष्टी ऑनलाइन उपलब्ध आहेत. तसे वीजमीटरचे रिंडीग घेण्यासाठी लागणारा वेळ व त्यात होणार्‍या मानवी चुका टाळण्यासाठी महावितरणने आता टीओडी मीटर बसविण्याचे धोरण स्वीकारले आहे. (Latest Pune News)

हे मीटर अत्याधुनिक आहेत. यात ग्राहकाला त्याचा वीजवापर मोबाईलमधून केव्हाही व कोठूनही तपासता येतो. त्यासाठी ‘महाविद्युत’ हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.नवीन मीटरमुळे महावितरणला रिडींग घेण्यासाठी कोणा बाह्यव्यक्ती अथवा कर्मचार्‍यांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

त्यामुळे ठरलेल्या तारखेला व काही क्षणांत मीटरचे रिडींग ऑनलाइन प्राप्त होते, शिवाय ते अचूक असते. त्यामुळे वीजबिल विनाविलंब तयार होऊन ग्राहकाला उपलब्ध होते. तसेच, सौरऊर्जेमुळे महावितरणला स्वस्त विजेची उपलब्धता दिवसा अधिक होत आहे. ही स्वस्त वीज ग्राहकांना दिवसा मिळण्यासाठी ग्राहकांकडे टीओडी मीटर आवश्यक आहे. टीओडी मीटर पूर्वीच्या मीटरप्रमाणेच पोस्टपेड असतील. त्यांचे बीलही नेहमीसारखेच घरपोच किंवा ऑनलाइन वीजबिल मिळणार आहे.

टीओडी मीटरमुळे विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ज्या ग्राहकांना मीटरवर शंका आहे, त्यांनी महावितरणच्या विभागाशी संलग्न असलेल्या मीटर चाचणी कक्षात त्याची प्रत्यक्ष पडताळणी करू शकतात. इथे जुन्या व नवीन मीटरवर समान वीजभार टाकून ग्राहकाला मीटर तपासून देण्याची सोय आहे.
- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT