पुणे; पुढारी वृत्तसेवा : रंग टाकल्याविना कुणा न सोडले… ज्यास त्यास रंग रंग रंग (कोरडे) लागले… असे वातावरण मंगळवारी धूलिवंदनाच्या दिवशी रस्तोरस्ती… सोसायट्यांमध्ये पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांनी सप्तरंगांची उधळण केली. चित्रपटाच्या गीतावर थिरकले. मात्र पाण्याचा वापर कमी करत कोरड्या रंगांची उधळण करत उत्सव साजरा केला.
आयुष्यात रंग भरणार्या धूलिवंदननिमित्त शहरात सकाळपासून रस्त्यावर उत्साहाचे वातावरण होते. बच्चे कंपनी विविध रंगांच्या पिचकार्या, वॉटर बॉल घेऊन घराबाहेर पडली. याच तरुण-तरुणीही मागे नव्हती. एकमेकांवर रंगांची उधळण करत प्रत्येक जण रंगोत्सवाचा आनंद लुटत होता. प्रत्येकाचे चेहरे रंगांनी माखून गेले… चित्रपटगीतांवर थिरकत लहान मुलांसह ज्येष्ठ जल्लोष करत होते. रस्त्यांवर, चौकात, सोसायट्यांमध्ये अन् घरोघरी धूलिवंदनाची रंगबाजी पाहायला मिळाली.
कसबा पेठ, रास्ता पेठ अशा मध्यवर्ती पेठांसह डेक्कन परिसर, कॅम्प, वानवडी, कोथरूड, प्रभात रस्ता, बाणेर, औंध आदी ठिकाणी धूलिवंदनाचा जल्लोष पाहायला मिळाला… पिचकार्यांनी एकमेकांना रंगांनी भिजविणारे लहानगे, घराच्या गॅलरीतून रंगांचे फुगे एकमेकांवर फेकणारे तरुण अन् एकमेकांना कोरडे रंग लावणारे ज्येष्ठ सगळीकडे दिसून आले.
पाण्याचा वापर टाळत अनेकांनी एकमेकांना कोरडे रंग लावण्यावर भर दिला. रस्त्यांवर रंग लावणार्या तरुणांचे ग्रुप दिसून आले आणि सगळ्यांनी एकमेकांसोब तची छायाचित्रे, सेल्फी सोशल मीडियावर पोस्टही केले. होळी साजरी – शहरात सोमवारी (दि. 6) मंदिरांसह सोसायटी आणि घरांमध्ये होळी साजरी करण्यात आली. सायंकाळी ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आले. मंदिरांमध्ये काही धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले होते.