नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : केंद्र सरकारच्या बीपी पासपोर्ट अॅपच्या माध्यमातून महापालिका रक्तदाब (बीपी) व मधुमेह रुग्णांची काळजी घेत आहे. त्यामुळे दरमहा नियमित तपासणी व त्यानुसार औषध उपचारासाठी त्याचा उपयोग होत आहे. शहरातील हजारो रुग्णांना याचा फायदा होत आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेची आठ रुग्णालये व 29 दवाखान्यांमधून रक्तदाब तसेच मधुमेही रुग्णांना ही सेवा मिळत आहे.
रुग्ण अनुभव
मला रक्तदाबाचा त्रास होतो; मात्र त्रास जाणवल्यावरच मी दवाखान्यात जायचो अन् गोळ्या-औषधे घ्यायचो. असं सगळं चाललं होतं; मात्र महापालिकेच्या पिंपरीगाव दवाखान्यात गेलो आणि मला बीपी पासपोर्ट अॅपच्या माध्यमातून नियमित तपासणी व उपचार सुरू झाले. त्यामुळे मागर त्रास खूप कमी झाला असून, या पद्धतीचा मला खूपच उपयोग झाल्याचे पिंपरीगावातील मोहन मोरे सांगत होते.
स्पर्धेचे युग, मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली व चुकीचा आहार- विहार याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने बीपी व मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने रक्तदाब व मधुमेही रुग्णांसाठी 'बीपी पासपोर्ट' अॅप बनविला आहे. गुगल प्लेवर अॅप स्टोअरवर जाऊन हा अॅप डाऊनलोड करता येतो.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये दररोज येणार्या रुग्णांचा रक्तदाब तपासला जातो. आवश्यक असेल, तर शरीरातील साखरेचीही तपासणीही केली जाते. नवीन रुग्णाला निदानासाठी तर जुन्या रुग्णांना योग्य त्या नियमित औषधोपचारासाठी हा अॅप उपयुक्त ठरत आहे.
दवाखान्यात येणार्या एकूण रुग्णांपैकी 25 ते 40 टक्के रुग्ण बीपी व मधुमेहाचे असतात. इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्हअंतर्गत नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच बीपी डायबिटीससारख्या आजारांसाठी हे सोपे अॅप केंद्र सरकारने स्थापित केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जात आहे. रुग्णालय अथवा दवाखान्यात येणार्या नवीन रुग्णाचे निदान करण्यासाठी तसेच जुन्या रुग्णांना योग्य त्या औषधोपचारासाठी हा अॅप उपयुक्त ठरत आहे.
– डॉ. वैशाली भामरे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी वाघेरे दवाखानाखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जेवणात मिठाचे जास्त प्रमाण, सतत मोबाईल वर असल्याने अस्वस्थता उशिरा झोपणे व उशिरा उठणे, त्यामुळे पचन संस्थेवर होणारा विपरीत परिणाम यामुळे बीपी व मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. केंद्र सरकारने राज्यांना तपासणीची एक पद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार, रुग्णांना उपचार दिले जातात. मधुमेह व बीपीच्या रुग्णांचे प्रमाण सात ते दहा टक्के आहे.
-डॉ पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी- चिंचवड महापालिका
रुग्ण पुढील तपासणीस न आल्यास केला जातो कॉल
हा अॅप संबंधित रुग्णालयातील नर्स त्या रुग्णाच्या नावाने डाऊनलोड करते. तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नावासह दरमहा त्याची या अॅपवर एन्ट्री केली जाते. त्याला देण्यात आलेल्या गोळ्या, औषधांचीही नोंद त्यावर केली जाते. पुढील बीपी तपासणीची तारीखसुद्धा त्यावर दिली जाते. त्या तारखेला रुग्ण रुग्णालयात अथवा दवाखान्यात तपासणीसाठी न आल्यास त्याला फोनवरून उपचारासाठी कॉल केला जातो.
बीपी पासपोर्टद्वारे दिला जातो हा सल्ला
प्रत्यक्ष भेटीसाठी पासपोर्ट आणा.
तंबाखू व मद्यपान टाळा.
तळलेले अन्नपदार्थ कमी खा.
मीठ कमी खा.
प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
आठवड्यातून किमान अडीच तास व्यायाम करा.
फळे व भाज्या रोज खा.
बीपी पासपोर्ट अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर रुग्णाला एक कार्ड दिले जाते. त्यास बीपी पासपोर्ट असे नाव आहे. त्यावर 'क्यू आर' कोड दिला गेला आहे. तो कोड स्कॅन केल्यानंतर त्या रुग्णाची संपूर्ण माहिती मिळते. रुग्ण पुढील तपासणीसाठी दवाखान्यात योग्य वेळी उपस्थित न झाल्यास त्याला फोन करून ट्रॅक केले जाते. आपला रक्तदाब ट्रॅक करा साखरेचे प्रमाण ट्रेक करा, असे आवाहन त्याला केले जाते.