वरसगाव धरणावर महाकाय मगरीचा थरार Pudhari Photo
पुणे

वरसगाव धरणावर महाकाय मगरीचा थरार

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

राजगड (वेल्हे) व मुळशी तालुक्यातील तुडुंब भरलेल्या वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर आज (बुधवार) (दि. ७) पहाटे साडे पाच फूट लांबीच्या महाकाय मगरीने ठाण मांडले. मगरीच्या थराराने तिला हुसकावून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर मगर चवताळून आली. त्यामुळे तिच्या दहशतीने सुरक्षा रक्षक अधिकारी जिवाच्या आकांताने आक्रोश करत सैरावैरा धावत होते.

मंगळवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून बुधवारी (दि. ७) पहाटे तीन वाजेपर्यंत महाकाय मगरीच्या थराराने मोठी दहशत पसरली. धरणावरील सुरक्षा रक्षकांसह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली.

अखेर राजगड (वेल्हे) तालुका वनविभागाने रेक्सु बावधन वन्यप्राणी पथकाच्या मदतीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मगरीला पिंजऱ्यात पकडून टेम्पोतुन नेऊन तिला तिच्या मुळ अधिवास क्षेत्रात सोडण्यात आले. जीवाच्या आकांताने भयभीत झालेल्या सुरक्षा रक्षक, अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

या विषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर सुरक्षा रक्षक राहुल जाधव व कुणाल कुराडे पाहरा देत उभे होते.

त्यावेळी भिंतीवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटजवळील भिंतीलगतच्या गवतात त्यांना मोठ्या सापासारखा प्राणी दिसला. राहुल जाधव याने बॅटरीच्या प्रकाशात जवळ जाऊन पाहिले असता तेथे महाकाय मगर असल्याचे दिसले. त्यानंतर वरसगाव धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत व पानशेतचे शाखा अभियंता अनुराग मारके यांनी धरणावर धाव घेतली. प्रवेशद्वार बंद केल्याने तेथुन बाहेर पडण्यासाठी मगर दोन्ही बाजूला धाव घेत होती. त्यावेळी हातात बॅटरी घेऊन तिला हुसकावून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर चवताळून धावून येत असल्याने सर्वांची घाबरगुंडी उडाली.

याची माहिती मिळताच राजगड (वेल्हे) तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी बावधन येथील वन्यप्राणी रेक्सु पथकासह धाव घेतली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची मोहीम सुरू केली. रेक्सु पथकाच्या १५ जवानांसह वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनिता अर्जुन, स्वप्निल उंबरकर आदी १० कर्मचारी तसेच वरसगाव धरणाचे सुरक्षा रक्षक या मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर पुन्हा पुन्हा मगर चढत होती. तिला हुसकावून लावणाऱ्यावर चवताळून धाव घेत असल्याने हातात बॅटरी, काठ्या असुनही सर्वांना मोठी कसरत करावी लागली. अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडून एका टेम्पोत ठेवण्यात आले.

राजगड तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे म्हणाले, मगरीला पकडून तिला तिच्या अधिवास क्षेत्रात पहाटे सोडण्यात आले आहे. तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडलेले नाही. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी घाबरू नये

मगर धरणात सोडण्यावरून शासकीय यंत्रणेत वादंग

वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर ठाण मांडून चवताळून येणाऱ्या मगरीपासून सुरक्षा रक्षक तसेच धरण खोऱ्यातील रहिवाशांच्या जिवीताला धोका आहे. त्यामुळे तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडू नये, अशी विनंती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुनही वनविभागाने सुरुवातीला विनंती मान्य केली नाही.

त्यामुळे वनविभाग व जलसंपदा विभागात वादंग रंगला. अखेर वनविभागाने मगरीला वरसगाव मध्ये सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

धरणातील पाणी सोडण्यासाठी तसेच पाहरा देण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीसह परिसरात २४ तास अधिकारी, सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मुख्य भिंतीवर मगर ठाण मांडून बसल्याने तिला पुन्हा धरणात सोडल्यास तिच्या पासून जिवितहानी होण्याची शक्यता आहे. मगरीला पकडल्यानंतर तिला धरणात सोडू नये यासाठी, जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही वनविभागाला विनंती करत होतो.

- अनुराग मारके,

शाखा अभियंता, पानशेत धरण

गेल्या तीन वर्षांपासून धरणात मगरीचे वास्तव्य आहे. धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उन्हाळ्यात तसेच पाणी वाढल्यानंतर पावसाळ्यात मगर धरणाच्या तिरावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पर्यटकांना धोका आहे. पहाटे मगर पकडण्यात आली असली तरी अजुन धरणात अनेक मगरी असाव्यात.

- देविदास हनमघर,

सरपंच, साईव बुद्रुक (ता. राजगड)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT