लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांवर गुन्हा दाखल Pudhari
पुणे

Bribery Case: लाच मागणाऱ्या तीन महिला तलाठ्यांवर गुन्हा दाखल

सांगरुण गाव, बहुल गाव, खडकवाडी गावच्या महिला तलाठ्यांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरालगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिहित झालेल्या जमिनीच्या सातबारा तसेच 8-अ उताराच्या प्रतीसाठी लाच मागणाऱ्या तीन गावांच्या तीन महिला तलाठ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेली तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी (दि. 25) ही कारवाई करण्यात आली आहे.

हवेली तालुक्यातील सांगरठी गावच्या तलाठी प्रेरणा बबन पारधी (30, रा. जी सोसायटी, गुलमोहर पार्कजवळ, पाषाण), बहुली गावच्या तलाठी दीपाली दिलीप पासलकर (29, रा. स्वामी समर्थनगर, काकडेनगर, कोंढवा) आणि खडकवाडी गावच्या तलाठी शारदादेवी पुरुषोत्तम पाटील (40, रा. कृष्णकुंज सोसायटी, मोरे वस्ती, मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन तलाठ्यांची नावे आहेत. याबाबत एका 42 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे. (Latest Pune News)

तक्रारदारांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना सांगरुण, बहुली, खडकवाडी आणि कुडजे या हवेली तालुक्यामधील गावांच्या हद्दीतील जमीन खरेदी-विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्ताविक रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या 7/12 तसेच ‌’आठ अ उतारा‌’ चे संगणकीकृत तसेच हस्तलिखित साक्षांकित प्रत हव्या होत्या. त्यासाठी ते सांगरुण येथे कार्यरत असलेल्या प्रेरणा पारधी, बहुली येथील तलाठी दीपाली पासलकर, तसेच खडकवाडी, कुडजे येथील तलाठी शारदादेवी पाटील यांना भेटले.

त्यावेळी सांगरुण गावातील त्यांना आवश्यक असलेल्या 7/12 च्या व आठ अच्या उताऱ्याच्या 240 प्रतींसाठी प्रेरणा पारधी हीने सरकारी फी व्यतिरिक्त 16 हजार 400 रुपयांची लाच मागितली. बहुली गावातील आवश्यक असणाऱ्या 7/12 व आठ अ उताऱ्याच्या आवश्यक असणाऱ्या 106 प्रतींसाठी दीपाली पासलकर हीने सरकारी फी व्यतिरिक्त 4 हजार 910 रुपयांची लाच मागितली.

तसेच खडकवाडी व कुडजे गावातील आवश्यक असणाऱ्या 7/12 च्या व आठ अ उताऱ्याच्या 32 प्रतींसाठी शारदादेवी पाटील हीने सरकारी फी व्यतिरिक्त 1 हजार 520 रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांच्याकडून 19 सप्टेंबर रोजी एसीबीकडे करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पडताळणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व तीनही महिला आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असून, एसीबीकडून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला गुन्हा...

या तक्रारीची पडताळणी तीनही महिला तलाठींकडे करण्यात आली. प्रेरणा पारधी हीने सरकारी फी 3 हजार 600 रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारी अगोदर 4 हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. आणखी 12 हजार 400 रुपयांची लाच मागितली.

दिपाली पासलकर हीने सरकारी फी 1 हजार 590 रुपये होत असताना तक्रारदाराकडे 6 हजार 500 रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम प्रेरणा पारधी हीच्याकडे देण्यास सांगितले.

शारदादेवी पाटील हिने सरकारी फी 480 रुपये होत असताना तक्रारदाराकडून तक्रारीपूर्वी 1 हजार 500 रुपये घेतल्याचे कबूल करून आणखी 2 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने हवेली तहसीलदार कार्यालयाबाहेर 25 सप्टेंबर रोजी सापळा रचला. शारदादेवी पाटील हिला तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT