‘श्री छत्रपती’च्या निवडणुकीत तिरंगी लढत; 24 एप्रिलच्या मुलाखतींकडे लागले सभासदांचे लक्ष Pudhari
पुणे

‘श्री छत्रपती’च्या निवडणुकीत तिरंगी लढत; 24 एप्रिलच्या मुलाखतींकडे लागले सभासदांचे लक्ष

श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर: श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, 17 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 18 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली आहे.

दि. 2 मेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्या दिवसापासूनच काही इच्छुकांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली. कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे व छाननीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेल उभा राहत असून, अजित पवार यांनी सर्वपक्षीय पॅनेलची घोषणा केल्यामुळे इतर पक्षांतील इच्छुक उमेदवार देखील आता जाचक यांच्या संपर्कात आहेत.

या सर्वपक्षीय पॅनेलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 24 एप्रिल रोजी होत असून, पवार यांच्या निकषामध्ये आता नेमके कोणते उमेदवार बसतात, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता असून, इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे देखील या मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत.

कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तानाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा पॅनेल उभा राहत आहे. तानाजीराव थोरात हे पॅनेल उभा करण्यासाठी इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधत आहेत. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पॅचअप घडविण्याचा अजित पवार प्रयत्न करतील का, याकडे देखील सभासदांचे लक्ष लागले आहे.

याव्यतिरिक्त कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जिजामाता पॅनेलने पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पॅनेलच्या बांधणीसाठी जिजामाता पॅनेलचे सुनील काळे यांनी मागील एक वर्षापासून कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीम सुरू केली आहे. अनेक उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत.

सध्या तरी श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत तीन पॅनेल उभे राहण्याच्या तयारीत आहेत. 24 एप्रिलच्या सर्वपक्षीय पॅनेलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतरच श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीतील पॅनेलचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अप्पासाहेब जगदाळे समर्थकाला संधी मिळेल का?

जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचे इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश सोसायट्यांवर वर्चस्व आहे. अनेक सोसायट्यांच्या संचालक मंडळांशी त्यांचा थेट संपर्क आहे. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्गाच्या उमेदवाराला सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे मतदान असते. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे यांच्या विचाराच्या उमेदवाराला श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळेल का, अशी देखील चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT