Katraj Kondhwa Water Supply Pudhari
पुणे

Katraj Kondhwa Water Supply: डोक्यावर पावसाच्या धारा; घशाला मात्र कायम कोरड! मुख्य जलवाहिनी सलग तीन वेळा फुटली

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल

पुढारी वृत्तसेवा

कात्रज: कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे. राजीव गांधी पंपिंग स्टेशन ते केदारेश्वर पाण्याची टाकी, या मुख्य जलवाहिनीतून तीन दिवसांत सलग तीनवेळा गळती झाल्याने अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला.

गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असताना दुसरीकडे नागरिकांना मात्र तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारी (दि. ८) रात्री बारा वाजता या भागात कमी दाबाने पाणी सोडण्यात आले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर परिसरातील संतप्त नागरिकांनी यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोकूळनगर एसबीआय बँकेसमोर गेल्या ६ जुलै रोजी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.

दुरुस्ती केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी गळती झाली. त्यानंतर एक तास पाणीपुरवठा सुरू होताच तिसऱ्यांदा जलवाहिनी फुटली.

परिणामी, तीन दिवसांपासून कात्रज-कोंढवा रोड परिसरात अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळालेले नाही. बुधवारी रात्री या भागात पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळाले नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

दुरुस्तीच्या कामाची चौकशी व्हावी

महापालिकेकडून जलवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात.

मात्र, दुरुस्ती झाल्यानंतर काही तासांतच जलवाहिनी पुन्हा फुटत असेल, तर संबंधित ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता तपासली जाते का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार गळती होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या समस्याकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

कोंढवा रस्ता परिसरातील यशश्री सोसायटीत पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, नळातून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी पाणीटंचाई आणि त्यानंतर दूषित पाणी, अशा दुहेरी संकटाचा सामना आम्हाला करावा लागत आहे.
- राजीव कुवड, रहिवासी
यशश्री सोसायटीत दूषित पाणी आल्याची तक्रार प्राप्त होताच या ठिकाणी तत्काळ दोन टँकर पाठविण्यात आले. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे काही भागांत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्या ठिकाणी दूषित पाणी जलवाहिनीत गेले असण्याची शक्यता आहे.
- दीपक रोमन, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT