पुणे

घोटावडे खूनप्रकरणी तीन जणांना अटक, पौड पोलिसांना यश; अनैतिक संबंधामुळे झाली हत्या

अमृता चौगुले

पौड, पुढारी वृत्तसेवा: घोटावडे (ता. मुळशी) येथे बापुजीबुवा मंदिराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला एक अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहासंबंधी खुनाची उकल करण्यात; तसेच काही तासांच्या आत तीन जणांना जेरबंद करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळी प्रेताचा चेहरा, हात, पायाची बोटे जंगली प्राण्यांनी खाल्ल्याने मृताची ओळख पटत नव्हती. या वर्णनाचा व्यक्ती हरवल्याची तक्रार दाखल आहे का, या अनुषंगाने मयताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. मयताच्या पोटरीवरील असलेल्या टॅटूवरून भोसरी पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईक यांना बोलावून मयताचे फोटो, कपड्याचे फोटो, टॅटू दाखवले असता त्यांनी हा मृतदेह प्रशांत आनंदा डोळस (रा. डोळसवस्ती, अशोकनगर, भोसरी) याचा असल्याची ओळख पटविली.

एकाच नंबरवरून मयतास 4 फोन आले असल्याचे व त्यानंतर मयताचा मोबाईल बंद झाल्याचे दिसून आल्याने शेवटचा फोन करणारा शेखर तात्याराम पाटोळे (रा. विठ्ठलनगर लांडेवाडी, भोसरी) याला पौड पोलिसांनी अटक केली. या वेळी शेखर याने सांगितले की, माझ्या मेव्हणीशी मयत प्रशांत आनंदा डोळस याचे अनैतिक संबंध होते. मी आणि मयत ज्या ठिकाणी कामास होतो, तेथून मयत प्रशांत डोळस याच्या सांगण्यावरून मला कामावरून काढण्यात आले. या संशयावरून मी प्रशांत डोळस यास दारू पार्टीचे आमिष दाखवून, बापुजीबुवा मंदिरादरम्यान प्रशांत डोळस याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चारीत टाकून दिले. याप्रकरणी शेखर तात्याराम पाटोळे (वय 33, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी, भोसरी), लखन भास्कर वाघमारे (वय 29, रा. गोकुळनगर, पठार वारजे) आणि दत्ता ऊर्फ बाबा चत्रभूज शिनगारे (वय 27, रा. आंबेडकरनगर लांडेवाडी, भोसरी) यांना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, संदीप सपकाळ आदींच्या पथकाने केली. मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख प्रमोद बलकवडे याचेही विशेष सहकार्य मिळाले. तपास विनायक देवकर हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT